नागपूर : कोंढाळी पोलीस ठाण्या (Kondhali Police Station) अंतर्गत शिवा येथील नदीपात्रात चार मित्र पाण्यात उतरले. धुळवळीनंतर त्यांना अंघोळ करायची होती. बोर नदीपात्रात (Bor River Basin) पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला. मंगेश यादवराव इंगळे (वय 23), देवानंद विनोद पवार (वय 22) अशी मृतकांची नावं आहेत. अभिषेक प्रकाश गावंडे (वय 22) व प्रणय श्रावण आखाडे (वय 34) यांचा जीव वाचला. शिवा बाजारगाव येथील मंगेश इंगळे, देवानंद पवार, अभिषेक गावंडे, प्रणय आखडे हे तरुण. शिवा मार्गावरील ब्रह्मलीन तपकिरी महाराज मंदिर (Brahmalin Maharaj Temple) गोपालपुरी येथील बोर नदीच्या पात्रात अंघोळीला गेले. पुलाखाली पाणी खोल होते. पाण्यात गाळ होता. पोहता येत नसल्याने देवानंद पवार व मंगेश इंगळे हे नदीच्या पाण्यात बुडाले. त्यांना बुडताना बघून सावध अभिषेक व प्रणय काठावर आले. मित्रांना वाचविण्याकरिता मदतीची याचना केली. पण, वेळेवर कुणी पट्टीचे पोहणारे धावून आले नाही.
घाबरलेल्या अवस्थेत ते गावात आले. त्यांनी आपल्या मित्रांना बुडताना पाहिले होते. अंघोळ हे फक्त निमित्त झाले. पाणी किती खोल आहे, याची त्यांना कल्पनाच आली नाही. त्यामुळं नदीपात्रात त्यांचा जीव गेला. नदीला जीवनदायिनी म्हणतात. पण, हिच नदी या दोन युवकांसाठी जीवघेणी ठरली.
गावाच्या दिशेने धाव घेऊन गावकर्यांना घटनेची माहिती दिली. कोंढाळी पोलीस स्टेशनचे निरीक्षक चंद्रकांत काळे, पोलीस उपनिरीक्षक राम ढगे, भोजराज तांदूळकर, बाबुलाल राठोड, पोलीस नायक नितेश डोकरीमारे आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. गावातील दोन कर्ते युवक गेल्यानं गावात शोककळा पसरली आहे.