बुलडाणा : मलकापूर येथील टेलिफोन कॉलनीतील 19 जानेवारीच्या रात्री 11 वाजताची घटना. बंद घराच्या अंगणातील विहिरीत कुत्री तिच्या पिल्लासह पडली. शेजारील सुरेश जंजाळकर यांना विहिरीतून कुत्र्यांचा आवाज ऐकू आला. तेथे त्यांनी बॅटरी लावून पाहिले. कुत्री व तिची दोन पिल्ले 60 फूट खोल विहिरीत पडलेली आढळली. त्यांनी तात्काळ पशू प्रेमी अॅड. आनंदकुमार शर्मा यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. सूचना मिळताच अॅड. शर्मा घटनास्थळावर पोहचले. त्यांनी आठ ते दहा लोकांना कुत्र्यांना वाचविण्यात सहकार्याची विनंती केली. परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे फारसे लोकं सहकार्य करू शकले नाही. शेवटी सुरेश जंजाळकर व अॅड. शर्मा यांनी लोखंडी डाल्याला दोर बांधला. शर्तीचे प्रयत्न करून रात्री दोन वाजेपर्यंत दोन्ही कुत्रीच्या पिल्लांना सुखरूप बाहेर काढले. परंतु रात्री चारपर्यंत प्रयत्न करूनही कुत्रीला बाहेर काढण्यात यश आले नव्हते.
सकाळी आठ वाजता पुन्हा सुरेश जंजाळकर व अॅड. शर्मा यांनी घटनास्थळावर पोहचून कुत्रीला वाचविण्यात सहकार्य करण्याची विनंती बजरंगदल शहर प्रमुख व आर. डी. हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष रीतेश दहीभाते यांना भ्रमणध्वनीद्वारे केली. रीतेश दहीभाते व त्यांचे सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून मदत कार्यात सुरुवात केली. पण, यश येत नसल्याचे बघून शेवटी रीतेश दहीभाते यांनी नरवेल येथील जितेंद्र कोलते यांच्याशी संपर्क साधला. थंडीचे दिवस होते, तरी ते आले. पिल्लांना बाहेर काढल्यानंतर त्यांना शेकोटीची उब देण्यात आली.
जितेंद्र कोलते यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 60 फूट खोल विहिरीत उतरले. कुत्रीला दोरीने बांधून सुखरूप जिवंत बाहेर काढले. टेलिफोन कॉलनीमधील अनेक घरामध्ये विहिरी आहे. त्यांच्या मुंडाली जमीन लेव्हललाच बांधलेल्या आहेत. त्यामुळे अनेक निष्पाप प्राण्यांचे जीव जात आहेत. रीतेश दहीभाते व अॅड. आनंदकुमार शर्मा यांनी नागरिकांना आपल्या विहिरीच्या मुडालांची उंची वाढविण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने नागरिकांना प्रेव्हेंशन ऑफ क्रुअल्टी टु अॅनिमल्स अॅक्ट 1960 नुसार कायदेशीर नोटिसी देऊन जनजागृती करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.