नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखली जाते. तालुक्यातील उकणी कोळसा खाणीतून दोन ट्रक कोळसा चोरण्याचा प्रयत्न झाला. जवानांच्या सतर्कतेने ही बाब उजेडात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा रावसाहेब दानवे म्हणाले, अशा प्रश्नांसाठी ही पत्रकार परिषद नाही. दानवे यांनी कोळसा चोरीच्या विषयावर स्पष्टपणे नकार दिला. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी नागपुरातील वेकोलीच्या मुख्यालयाला (Vekoli Headquarters) भेट दिली. या प्रकरणात मोठे मासे संशयित असल्याचे सांगितलं जातंय. कोट्यवधी रुपयांचा हा ठेका आहे. या प्रकरणात तेरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही आरोपींना पोलिसांनी अटकही केलीय. तरी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी चुप्पी का साधली असा प्रश्न निर्माण होतो. या कोळसा चोरी (Coal Theft) प्रकरणामुळं वेकोलीचा कारभार चव्हाट्यावर आलाय.
कोळसा चोरांनी दोन ट्रक कोळसा चोरला. कोळसा भरणारी लोडर मशीन कुणाची? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचे उत्तर कोण देणार? कोळसा खाण प्रकल्प अशा तस्करांमुळे बदनाम होतोय. खाणींतील चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी व्हिजिलंस विभागावर आहे. पण हा विभागसुद्धा या चोऱ्यांमध्ये लिप्त असल्याची शंका व्यक्त केली जातेय. कारण काही वर्षांपूर्वी काटा घरावरून होणारी कोळसा चोरी उघडकीस आली. बारा चाकी ट्रकची फक्त दहा चाकेच काट्यावर चढवली जात होती. ती चोरी पकडल्यावरसुद्धा सर्वांनी हात वर केले. याहीवेळी असेच काहीतरी होण्याची शक्यता आहे. अशावेळी केंद्रीय मंत्र्यांनी यावर बोलणे आवश्यक होते. पण ते काही बोलले नाहीत.
रावसाहेब दानवे म्हणाले, 2014 साली असलेला 18 लाख कोटींचा भारतीय अर्थसंकल्प आज 39 लाख कोटींचा झाला. 144 लाख कोटींचा विकासदर आता 210 कोटींचा झाला. प्रत्यक्ष कर 2014 पासून अजिबात वाढलेला नाही. यापूर्वी 23 टक्क्यांच्या घरात असलेला अप्रत्यक्ष कर आता 18 टक्क्यावर आला आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात अकराव्या स्थानावर होती. ती आज पाचव्या स्थानावर आली आहे. भारताची अर्थव्यवथा तीन ट्रिलीयनवरून पाच ट्रिलियनपर्यंत नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.