नागपूर : पारशिवनी पोलीस ( Parshivani Police) ठाण्याच्या हद्दीत ही घटना बुधवारी दुपारी घडली. करंभाडजवळ आमनेसामने दुचाकींची धडक झाली. यात माजी जि. प. सदस्य कमलाकर मेंघर (वय 63) (Kamlakar Menghar) व प्रकाश सावरकर (वय 28) या दोघांचा मृत्यू झाला. कमलाकर मेंघर आपली दुचाकी घेऊन करंभाड शिवारातील शेताकडे जात होते. करंभाडजवळ प्रकाश सावरकर हा निंबा येथील सूतगिरणी कंपनीकडून विरुद्ध दिशेने येत होता. प्रकाश कंपनीतून सावनेर ते पारशिवनी मार्गे (Savner to Parshivani) या महामार्गावर अतिशय जलदगतीने येत होता. प्रकाशची दुचाकी सुसाट असल्याने समोरील दुचाकीला पाहून त्याला वेग नियंत्रित करता आला नाही. यात कमलाकर मेंघर व प्रकाश सावरकर यांची सूत गिरणीजवळ आमनेसामने धडक झाली.
या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. यापैकी प्रकाश सावरकर हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस जखमी कमलाकर मेंघर यांना वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात होते. दरम्यान, रस्त्यातच त्यांचाही मृ्त्यू झाला. दोघांच्या मृतदेहांचे पारशिवनीतील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. कमलाकर मेंघर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असल्याचं समजते.
मृतक प्रकाश हा सुसाट गाडी चालवित होता. त्यामुळं अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या सुसाट वेगामुळं प्रकाशचा तर जीव गेलाच शिवाय समोरून येणाऱ्या चालकालाही आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळं दुचाकी चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.