नागपूर : नागपूर जिल्हा प्रशासनाने वाढते रुग्ण लक्षात घेतात बाजारातील बेपर्वा वृत्तीच्या लोकांवर कारवाई करणे सुरू केले आहे. कळमना बाजार परिसरात विना मास्क गर्दी करणाऱ्या 16 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंड न भरू न शकणाऱ्या दहा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटात आज 14 हजार 654 तरुणांचे पहिल्या दिवशी लसीकरण झाले.
नागपूर शहरात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. शहर तिसरा लाटेच्या वाटेवर असताना अनेकजण बेपर्वाईने वागत आहे. अशा बेपर्वा वृत्तीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शहरात, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. परिस्थिती हळूहळू विस्फोटक होत असून नागरिकांनी तातडीने आपले लसीकरण करून घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
कळमना मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात विना मास्क भटकंती सुरू असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नागपूर तहसील कार्यालय, नागपूर शहर, नागपूर महानगरपालिकेचे लकडगंज झोन कार्यालय, कळमना पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तहसीलदार सूर्यकांत पाटील, यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी अनिल ब्राह्मणे, तलाठी सोमलकर, सहाय्यक आयुक्त विजय होणे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. 16 नागरिकांकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. तर पाचशे रुपये दंड भरू न शकणाऱ्या दहा लोकांविरुद्ध पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले.
दरम्यान, ग्रामीण भागात सुरू झालेल्या 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहिल्याच दिवशी 6 हजार 615 मुलांचे लसीकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 65 केंद्रांवर व्यवस्था केली होती. उपलब्ध आकडेवारीनुसार 1 लाख 32 हजार 832 या वयोगटातील लसीकरण योग्य संख्या आहे. शहरात 8 हजार 39 तरुणांचे लसीकरण झाले. नागपूर जिल्हयात एकूण 14 हजार 654 जणांचे लसीकरण झाले.