सुनील ढगे
नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे. मात्र त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भ राज्यासाठी मिशन -30 सुरू करण्यात येत आहे . मिशन थर्टी (Mission Thirty) म्हणजे देशातील तिसावं राज्य असा याचा अर्थ आहे. या मिशनला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करायला देशातील प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) नागपुरात दाखल झाले. त्यांनी विदर्भ राज्याची भूमिका समजून घेण्यासाठी विदर्भातील विदर्भवादी नेते आणि इतर मान्यवर यांच्यासोबत संवाद साधला.
छोट्या राज्यांची संकल्पना असली तरी विदर्भ हे छोटे राज्य होणार नाही. कारण इथे दहा लोकसभा आहेत. त्यासोबत वेगळे राज्य का ? यामागची मागणी भूमिका काय, इथली भौगोलिक आर्थिक परिस्थिती काय? या सगळ्या बाबींवर विचार केल्यानंतरच यावरची रणनीती ठरेल.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून आमची टीमसुद्धा या भागातील अनेक लोकांशी संपर्क साधत आहे. वेगळ्या विदर्भाची रणनीती ठरवताना मी त्यांना सहयोग करणार आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले.
मात्र आंदोलन करायचं की आणखी काय ते विदर्भातील या नेत्यांना आणि विदर्भातील जनतेलाच ठरवायचं आहे. हा प्राथमिक संवाद आहे. यानंतर नेमकं काय पुढे येते. कशी रणनीती ठरते हे आपल्यापुढे विदर्भातील नेते मांडतील, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.
वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे अनेक नेते या ठिकाणी प्रशांत किशोर यांच्याशी संवाद साधत आहेत. प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून काही रणनीती ठरेल.
वेगळे विदर्भ राज्य होत असेल तर त्याचा फायदा विदर्भाला होईल. मात्र जे करायचं ते विदर्भातील जनतेलाच करावा लागणार असं विदर्भवादी नेते विजय जावंधिया यांनी सांगितलं.
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आतापर्यंत अनेक आंदोलन झाली. मात्र वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मार्गी लागला नाही. भाजपने सुद्धा वेगळ्या विदर्भा संदर्भातला प्रस्ताव पारित केला होता. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही.
आता मात्र रणनीतीकाराच्यामार्फत मिशन- 30 सुरू होत आहे. याला कितपत यश मिळते. विदर्भ राज्य वेगळं होण्याचा मार्ग सुकर होतो का हे पहावं लागणार आहे.