नागपूर : गेल्या दोन दिवसांच्या गारपिटीमुळं विदर्भातील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. वीज पडून विदर्भात तीन जण ठार झालेत. शेतातील गहू, संत्रा, हरभरा, कापूस या पिकांचं नुकसान झालंय. याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले जातील. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असं आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं. दरम्यान, महाज्योतीनं 15 हजार एकरवर करडई पिकाची लागवड केली. महाज्योती करडई तेलाचं ब्रॅंडिंग करणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्रात ओमिक्रॅान आणि कोरोना रुग्णवाढीचा वेग दुप्पट झालाय. लोकांची सुरक्षा म्हणून आम्ही काही निर्बंध लावलेत. नव्या वर्षाची सुरुवात शुभ व्हावी, यासाठी हे निर्बंध आहेत. 31 डिसेंबरच्या पार्टीत मोठी गर्दी होते म्हणून निर्बंध लावले आहेत. 31 डिसेंबरच्या पार्टीत एकाचा श्वास दुसऱ्याच्या तोंडात जातो. यामुळे कोरोना वेगानं पसरण्याची भीती असते. त्यामुळं हे सारं कराव लागल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
नवीन वर्षात निर्बंध कडक होणार का याबाबत चर्चा झाली. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. कालीचरण हा नालायक माणूस आहे. तो भोंदू आहे. स्वस्त प्रसिद्धीसाठी तो बोंबलतो. कालीचरणची महात्मा गांधींबाबत बोलण्याची औकात नाही. गांधीजींना अवघ्या जगाने स्वीकारलं, असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथील नयन परमेश्वर पुंडे या बारा वर्षीय बालकाचा वीज कोसळून मृ्त्यू झाला. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात सातरगाव शिवारात अंगावर वीज पडून रवींद्रसिंग चव्हाण (वय 30) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथे वीज पडून गजानन बापूराव मेंढे (वय 42) शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीमध्ये बुधवारी दुसऱ्या दिवशीही गारपीट झाली. नागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यात पावसाची नोंद झाली. ठिकठिकाणी गारा पडल्याचं दिसून आलं. या गारपिटीचा फटका भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याला जास्त बसला. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातही पावसासह काही ठिकाणी गारपीट पडली. गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली. दुपारी चामोर्शी, कोरची तालुक्यासह काही ठिकाणी गारपीट झाली.
चंद्रपूरमध्ये बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने चांगलेच झोपडले. ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ४१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गडचिरोलीत २७ मिमी, गोंदियात १४.२ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारपासून किमान तापमान आणखी खाली घसरण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. नव्या वर्षाची सुरुवात थंडीच्या लाटेने होण्याची शक्यता आहे.