नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन पार्टी आज आक्रमक झाली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी वेगळ्या विदर्भ राज्याचा प्रस्ताव केंद्राकडं आला नसल्याचं वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केलं. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन नागपुरात करण्यात आलं. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी लवकरच दिल्लीत आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला.
आता विदर्भाच आंदोलन आता आणखी तीव्र करणार असल्याचं विदर्भ राज्य आंदोलन पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष अरूण केदार यांनी सांगितलं. अरूण केदार म्हणाले, वेगळ्या विदर्भाची मागणी 108 वर्षे जुनी आहे. खर तर ही मागणी ब्रिटिशकालीन होती. केंद्रानं इतर छोटे छोटे वेगळे राज्य दिले. पण, विदर्भ का दिलं नाही, असा सवालही त्यांनी केला.
केंद्राचे गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलं की, विदर्भाचा प्रस्ताव केंद्राकडं आला नाही. या त्यांच्या वक्तव्याचा पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. जय विदर्भाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. केंद्र सरकार, भाजप सरकारचा निषेध करण्यात केला. तसेच केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
नागपुरातले बनवारीलाल पुरोहित हे राज्यपाल आहेत. त्यांनी 1995 ला भूवनेश्वर येथे वेगळ्या विदर्भाचा ठराव भाजपच्या बैठकीत मांडला होता. तो भाजपनं संमत केला होता. असं असताना केंद्रीय मंत्री वेगळ्या विदर्भाचा प्रस्तावच आला नाही, असं कसं बोलू शकतात. केंद्रानं ३७० कलम रद्द केलं. लडाखला केंद्रशासित प्रदेश केलं. तेव्हा तुम्हाला कुठलं समर्थन मिळालं होतं, असा सवाल अरुण केदार यांनी विचारला.
दोन्ही हाऊसमध्ये शिक्कामोर्तब झालेले बिल तुम्ही मागे घेऊ शकता. कृषी कायदे रद्द करू शकता. मग विदर्भाची वेगळा का करता येणार नाही, असा प्रतिप्रश्न अरुण केदार यांनी विचारला. दिल्लीतील सरकारपुढं आता आम्ही आंदोलन करणार आहोत. वेगळा विदर्भ राज्य मिळालंच पाहिजे. विदर्भाच्या नावानं राज्यात भाजप सरकार होती. विदर्भ आमची देवी आहे. विदर्भ चंडिका आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व हवं, असंही केदार म्हणाले.