केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे येऊन गेले. त्यांनी बैठकीमध्ये मायक्रो प्लॅनिंगवर भर दिला. एक एक जागा जोडण्याचा मंत्र दिला. विदर्भासह मराठवाड्यावर भाजपचे विशेष लक्ष आहे. लोकसभेचा वचपा काढण्यासाठी भाजप अधिकाधिक जागा लढवण्यावर भर देत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने पण भाजपवर मोठा डाव टाकला आहे. विदर्भातील 62 जागांपैकी अर्ध्या जागांच्या जवळपास शिंदे गट विधानसभेसाठी आग्रही आहे. त्यामुळे अनेक जागांसाठी रस्सीखेच दिसून येईल. तर काही भागात बंडाळी सुद्धा होऊ शकते.
इतक्या जागांवर केला दावा
विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने विदर्भातील सर्व 62 मतदारसंघात सर्वे केला आहे. त्यात विदर्भातील 24 जागांवर आमची चांगली स्थिती असल्याचा दावा कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीत आम्ही 24 जागा लढणार आहे. आमच्या मित्रपक्षाला आम्ही समजावून सांगू, असे राठोड म्हणाले.
11 जिल्ह्यात मजबूत दावेदारी
विदर्भातील 11 ही जिल्ह्यात शिवसेना निवडणूक लढणार आहे. विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात शिवसेना नशीब आजमावणार आहे. त्यातच अजित पवार यांनी सुद्धा विदर्भात जनसंवाद यात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन केले होते. शिंदे गटाच्या 24 जागांवरील दाव्यामुळे भाजप आणि पवार गटाच्या खात्यात 32 जागा येतील. अर्थात हा दावा दोन्ही पक्षांना किती मान्य होतो हा प्रश्नच आहे. अनेक जागांवर अजून ही महायुतीत रस्सीखेच दिसून येत आहे. विदर्भात भाजपचं पारडं जड असताना त्यांना हा दावा कितपत मान्य होतो हा प्रश्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी दौऱ्यावर
5 ॲाक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहोरादेवी येथे नगारा भवनचं लोकार्पण होणार आहे. या तारखेला बंजारा समाजाची काशी पोहोरादेवी येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेला एक लाख लोक येणार असल्याचा दावा संजय राठोड यांनी केला. पोहोरादेवी येथे भव्य दिव्य नगारा भवनची इमारत सज्ज झाल्याची माहिती त्यांनी दिली.