नागपूरः विदर्भात मान्सून (Vidharbh Monsoon) दाखल होण्यास अजून वेळ असला तरी शेतकऱ्यांची मात्र बियाणे खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी उद्योग दुकानात मोठी गर्दी करताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे बियाने खरेदीला (Seed purchase) सुरुवात झाली, त्यावरून यावर्षी विदर्भात कापसाचा पेरा (Cotton seeds) वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळाला होता, त्यामुळे शेतकरी कापसाकडे वळताना दिसत आहे. विदर्भ हा कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मात्र मागील काही वर्षात कापसाला मिळत असलेला कमी भाव आणि त्यासाठी लागणारा खर्च बघता शेतकऱ्यांच्या जास्त नुकसानच येत आहे.
त्यामुळे शेतकरी कापसापासून दूर जाताना दिसून येत होता, मात्र यावर्षी ज्या प्रमाणे खरेदी होत आहे त्यावरुन तरी असे दिसून येते की विदर्भात कापसाला पुन्हा चांगले दिवस येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पेरणी करण्यास सुरुवात करत आहे. मात्र जोपर्यंत पाऊस 75 ते 100 मि.मि झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा हजारपेक्षा अधिक हेक्टर सोयाबीनचे पेरणी केली जात असते. सोयाबीन पेरणीसाठी स्व: उत्पादीत चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावेत. पेरणीसाठी प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीचा किंवा प्लांटरचा वापर करावा.
सोयाबिनची उगवण क्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे आणि नंतर बियाण्याची 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे.