नागपूर | 10 सप्टेंबर 2023 : मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र हवं आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात उपोषण सुरू केलं आहे. जरांगे पाटील आजपासून पाणी आणि औषधांचाही त्याग करणार आहे. त्यामुळे मराठा आंदोलन अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने विरोध केला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊ नका, नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ओबीसींनी दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून आज राज्यभरात ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे. विशेष म्हणजे भाजपचा नेताही या आंदोलनात सहभागी होणार आहे. काँग्रेसचा नेताही या आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा हा सर्वच राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
भाजपच्या ओबीसी सेलचे नेते आशिष देशमुख यांनी ओबीसींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आम्ही आज ओबीसींच्या आंदोलनात सहभागी होतोय. मराठा समाज आर्थिक मागास नाही, त्यामुळे मराठ्यांनी मागास असलेल्या ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मागू नये. मराठा समाजाला ओबीसीतून अर्धा टक्काही आरक्षण देऊन नये, अन्याथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आशिष देशमुख यांनी दिला आहे.
मराठा समाजाला आर्थिक मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावं. त्याला आमचा विरोध राहणार नाही. तसं केल्यास आम्ही मराठा समाजाच्या या आरक्षणाला पाठिंबाच देऊ, असं सांगतानाच सरकारला कळावं म्हणून पक्षाचे पादत्राणे बाजूला ठेऊन आम्ही या आंदोलनात सहभागी होतोय, असं आशिष देशमुख यांनी स्पष्ट केलं.
विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ओबीसी हक्कासाठी जागृत होत आहेत. ओबीसींच्या हक्काचं कोणीही हिसकावून घेऊ नये. आजच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मी आंदोलनात सहभागी होणार आहे. ओबीसींच्या हक्कासाठी जिथे जिथे आंदोलन होतील तिथे एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून मी जाणार आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं. काल मी ओबीसी ए आणि बी चा आणि EWS चा पर्याय सूचवला होता. हा पर्याय ओबीसी संघटनांना मान्य नसेल तर आम्ही मागे घेऊ. पण ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही. ओबीसी ए आणि बी चा फॅार्म्युला 2013 साली देवेंद्र फडणवीस यांनीच मांडला होता, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
माझ्या वाक्यातून अर्धवट ऐकून काही पक्षाचे लोक जाणुबूजून आग लावण्या प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारच्या हातात काही नाही. आतापर्यंत हे झोपलो होते. त्यामुळे दोन पर्याय सूचवले आहेत. योग्य वाटेल तो घ्या. जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यामुळेच मी एक पर्याय सूचवला होता.
ओबीसींचे सरसकट प्रमाणपत्र देणं शक्य नाही. जरांगे पाटील काहीही मागणी करतील ते शक्य नाही. त्यांची मागणी कायद्याला धरुन नाही. ओबीसींचे सरसकट प्रमाणपत्र दिलं तर विजय वडेट्टीवार रस्त्यावर उतरेल. वंशावळीच तोडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर वडेट्टीवार रस्त्यावर उतरेल, असा इशाराच त्यांनी दिला.