नागपूर | 20 ऑगस्ट 2023 : ब्राह्मणांवर मी टीका करत नाही. पण एक गोष्ट खरी आहे. ती म्हणजे ब्राह्मणांमध्ये शिवाजी आणि संभाजी ही नावे ठेवली जात नाहीत, असं सांगतानाच देशात फक्त साडेतीन टक्के लोकसंख्या असलेल्या लोकांनाच शिक्षणाची दारे खुली होती. ब्राह्मणांनी ब्राह्मण स्त्रियांनाही शिक्षणापासून वंचित ठेवले होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळेच सर्वांना शिक्षणाची दारे खुली झाली, असं विधान राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. भुजबळ यांच्या या विधानावर हिंदुत्ववादी संघटनांनी टीका केली आहे. तर काँग्रेसने मात्र भुजबळ यांच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळ यांनी खरंच सांगितलं. चुकलं काय? असा सवालच केला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. भुजबळ बोलले ती वस्तुस्थिती आहे. भुजबळ सत्तेत राहून जर असं बोलत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. बहुजनाचे नेते म्हणून आम्ही त्यांना बघत होतो. ते जर या भाषणावर ठाम राहीले, शब्द फिरवले नाही, मागे घेतले नाही तर खरा भुजबळ. नाहीतर गेलेले बळ, गेलेला भुजबळ असं होईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास मोहीमेवर टीका केली. भाजपच्या घरघर अभियाना विरोधात आम्ही ‘खरं खरं दाखवा’ अभियान राबवू, असं सांगत भाजपच्या मोहिमेला सुरुंग लावण्याचं सुतोवाचच वडेट्टीवार यांनी केलं. सगळ्या योजना या काँग्रेसच्या काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच योजनांचं प्रमाणपत्र देणे सुरू आहे. अनेक भागात घर दिले नाही तरीही घर दिल्याचं प्रमाणपत्र देण्याचं काम करून अभिनंदन केलं जात असल्याच्या तक्रारी आहेत. काल शासन आपल्या दारी कार्यक्रमातून लोक उठून गेले. लोकांच्या मनात निराशा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतून लोक उठून गेले. घरोघरी जाऊन लोकांना मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
दैनिक सामनातून काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे भाजपने सामनाला कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामनातील भाषा नीट वाचली. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना सपोर्ट करण्यात आलेला आहे. सामनातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायलाच वाचा फोडण्यात आली आहे. त्यांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री का केलं? त्यांची गुणवत्ता, अभ्यास पाहता आज त्यांची मात्र कुचंबना होते आहे. त्यांना जाणूनबुजून सन्मान कमी करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
यावेळी त्यांनी कांदा निर्यातीवरही भाष्य केलं. शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत होते तेव्हा निर्यात केला. भाव पडतात तेव्हा चुकीचा निर्णय घेतला जातो. ज्यावेळेस शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही, त्यावेळेस त्यांना निर्यातीची परवानगी दिली पाहिजे. आताचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर आहे, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या हाल भावना तो निर्णय मागे घेण्याची आवश्यकता आहे, असं ते म्हणाले.