नागपूर | 11 सप्टेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्यासोबतचं कारण सांगितलं आहे. आम्ही कुणाच्या दबावाखाली भाजपसोबत गेलो नाही. तर आम्हाला विकासाची कामे करायची होती. कामांचा दबाव होता, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजितदादांचा हा दावा फेटाळून लावला आहे. या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी थेट अजित पवार यांना खुलं आव्हानच दिलं आहे. तसेच योग्यवेळ येताच पोलखोल करण्याचा इशाराही दिला आहे.
विजय वडेट्टीवार मीडियाशी संवाद साधत होते. अजितदादांना किती इमानदारीची भाषा करू दे. आमच्याकडे पण पुरावे आहेत. कोण कशासाठी गेला हे आम्हाला माहीत आहे. सत्तेसाठी गेला. सेवेसाठ कोण गेलं? विकासासाठी कोण गेलं? ईडीच्या दबावात कोण गेलं? हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. योग्य वेळी आवश्यकता असल्यास कोर्टाच्या आदेशापासून सगळं उघड करू. विरोधकांना ज्या धमक्या देतात ते आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्रा जनतेला माहीत आहे तुम्ही कितीही तुमचे पाप लपवले तरी लपणार नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. सुनील तटकरे कुणाचा मुख्यमंत्री बनवण्याचे पोस्टर बॅनर लावण्याचं काम करत आहेत. फटा पोस्टर निकला हिरो. आता कुठे पोस्टरमधून कोण निघतील. मुख्यमंत्री होण्याचे स्पर्धा लागलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरून बाशिंग बांधून फिरू नका, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी तटकरे यांना दिला.
दोन्ही समाजात वाद निर्माण करण्याचे काम सरकारने सुरू केल आहे. मराठा समाजच नव्हे तर धनगर समाजाची आरक्षण देण्याच्या नावाने फसवणूक करण्याचे काम केले. त्या बळावर भाजपने 115 जागा निवडून आणल्या. समाजाची फसवणूक सरकारने केली. टिकाऊ आरक्षण देता येत नसल्यामुळे तकलादू आरक्षण सरकारने दिलं. समितीचे अध्यक्ष जरी अशोक चव्हाण होते. तरी गुलाबराव पाटील आणि एकनाथ शिंदे सगळे त्या समितीत होते. मतदान केंद्रावर कोणाकोणाची फसवणूक केली हे वेळ आल्यावर जनता दाखवेलच, असंही ते म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको ही भूमिका स्पष्ट आहे. सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे. हे लक्षात ठेवून दोन्ही समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. एका समाजाचा काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाही. यासाठी सरकारने मध्यस्थी मार्ग निवडावा.
मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा अशी आमची भूमिका आहे. सरकारकडून काय प्रस्ताव येतो त्यावर चर्चा होईल. मी काही मांडण्यापेक्षा सरकारने तो प्रस्ताव कसा मांडावा, काय मांडावा? कुठे समाजाला आरक्षण द्यावं की नाही द्यावं आणि ते कसे द्याव हा सरकारचा प्रश्न आहे. यात योग्य मार्ग काढून यासाठी शासनाने प्रयत्न करावे, असं ते म्हणाले.
मराठा समाजाने मतभेद होईल असे इशारे देऊ नये. कोणी कोणाला इशारे देऊ नये. इशाराने प्रश्न सुटणार नाही. तर सामंजस्याने प्रश्न सुटणार आहे. दोन्ही समाजाने सामंजसपणा दाखवून कोणी कोणाचं वाईट करणार नाही या भूमिकेतून पुढे जावं आणि तसाच मार्ग त्यातून काढावा. असे आवाहन मराठा आणि ओबीसी समाजाला आहे. दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ नये असे काम कोणी करू नये, असंही त्यांनी सांगितलं.