नागपूर: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी असून त्यांचा पगार वाढवण्याची गरज आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मधला मार्ग काढण्याची गरज आहे, असं सांगतानाच विरोधक एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देत आहेत. संप चिघळवण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहनही वडेट्टीवार यांनी केलं.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. पगार वाढवण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाच्या माध्यमातून संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटायला हवा. प्रवाशांना वेठीस धरणं योग्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी मधला मार्ग काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू आहेत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये भाजपने एन्ट्री केली आहे. त्यावरूनही त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. विरोधी पक्षातील नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देत आहेत. विरोधी पक्ष नेते प्रवाशांना वेठीस धरत आहेत. काही राजकीय पक्ष संप चिघळवू पाहत आहेत. भाजप सत्तेत होता तेव्हा एसटीचं विलनीकरण शक्य नसल्याचं सांगितलं जात होतं. आता तेच भाजप नेते एसटीच्या विलनीकरणाची मागणी करत आहेत, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.
एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं ही विनंती आहे. संपावर सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचे आमचे प्रयत्न आहेत. चर्चा करण्याची आणि मार्ग काढण्याची आमची तयारी आहे, असं सांगतानाच मागच्या सरकारमध्ये अर्थमंत्र्यांनी शब्द फिरवला. त्यांचा पूर्ण व्हिडीओ आहे. अर्धा व्हिडीओ नाही, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी नक्षलवादी कारवायांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सुरजागडच्या लोह खनिज खाणीच्या अनुषंगाने नक्षलवाद्यांनी काही आरोप माझ्यावर केले आहेत. त्याची चौकशी गृहविभाग करत आहे. गृह विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. सुरजागडच्या लोह खनिज खाणीशी, त्याच्या सुरु होण्याशी माझा काहीही संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं. एटापल्लीला जे आंदोलन होतं, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही. या प्रकरणाला घेऊन लोह खनिज मालकाशी माझा संबंध नाही. रोजगार निर्माण व्हावा हाच उद्देश आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची सतेज पाटलांकडून दखलही नाही, महाडिकांचा आरोप; राजीनामा देण्याची मागणी
भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, राष्ट्रवादी जाब विचारणार; ईडी कार्यालयावर धडकणार