तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, भंडारा : जिल्ह्यात वनकर्मचारी आणि जंगलाशेजारील गावे यांच्यात संघर्ष पेटला. वन्यजीवांचे संरक्षण होत असताना गावातील लोकं ठार होत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचे संरक्षण वनात करावं, अशी गावकऱ्यांची भूमिका आहे. एखादा गावकरी वनात गेला, तर वनकर्मचारी अडथळा आणतात. मग, वन्यप्राणी शेतात शिरल्यास वनकर्मचारी काय करतात, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. जंगलाशेजारील काही गावांमध्ये ईडीसीच्या माध्यमातून होणारी कामं थांबली आहेत. लोकांच्या भल्याचा विचार सोडून वनकर्मचारी प्राण्यांचे भले पाहतात, असा लोकांचा आरोप आहे. त्यामुळे हा संघर्ष खऱ्या अर्थाने पेटला आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चार दिवसांपूर्वी गुडेगाव आणि खातखेडा या गावात वाघाने प्रचंड दहशत माजवली होती. गुडेगाव या गावातील एका वाघानं हल्ला करून ठार केलं होतं. तेव्हापासून या परिसरातील ग्रामस्थांनी वाघाचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी रेटून धरली होती.
हाकेच्या अंतरावर असलेल्या खातखेडा या गावातील ईश्वर मोटघरे यांच्यावर बुधवारी सकाळच्या वेळी वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचलेल्या वनाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार यांच्यासह शैलेश गुप्ता, दिलीप वावरे या वन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली.
ग्रामस्थांच्या मारहाणीत तिन्ही गंभीर जखमींवर नागपूर इथं उपचार सुरू आहेत. शासकीय कामात अडथळा निर्माण करून वनाधिकाऱ्यांना मारहाण केली. अन्य वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी वनविभागाची तक्रार आहे.
या प्रकरणी खातखेडा वन विभागाच्या बीट रक्षक संगीता घुगे यांनी पवनी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी मुन्ना तिघरे, सीतकुरा काटेखाये, रवी खातकर, राजकुमार काटेखाये, युवराज मोटघरे यांच्यासह 150 महिला आणि पुरुषांच्या विरोधात गुन्हे दाखल केले.
जंगलाशेजारील गावांच्या विकासासाठी ईडीसी स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यापैकी बोटावर मोजण्याएवढ्या ईडीसी कार्यरत आहेत. गावाला लागून बफर झोन सोडणे गरजेचे होते. पण, वनकर्मचाऱ्यांनी गावाला लागून कोअर झोन तयार केले आहेत. याचा रोष गावकऱ्यांमध्ये आहे. पूर्वापार चालत आलेल्या आमच्या जंगलात आम्हालाच बंदी का, असाही सवाल स्थानिक गावकरी करतात. त्यामुळे हा संघर्ष शिगेला पोहचला आहे.