नागपूर : नंदनवनमधील निवृत्त डॉक्टर आजीचा नातवानं खून केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणात आता नवा खुलासा आला आहे. मितेश पाचभाई हा तीन-चार गर्लफ्रेंडच्या संपर्कात होता. मौजमजा करण्यासाठी त्याला पैसे हवे होते. पण, आजी कडक स्वभावाची असल्यानं ती त्याचे फाजील लाड पुरवित नव्हती. त्यामुळं त्यानं आजी देवकाबाई बोबडेचाच खून केल्याचा खुलासा झालाय.
मितेशचे आई-वडील डॉक्टर असल्यामुळे सकाळी ते हॉस्पिटलला निघून जायचे. मितेश अभ्यास आणि नोट्स देण्याचा बहाणा करून तीन-चार वेगवेगळ्या मुलींना घरी बोलवत होता. मात्र त्यांची आजी चौकशी करत असल्यानं मितेश आणि आजीची नेहमी बाचाबाची व्हायची. मितेशच्या खोलीत वारंवार जाऊन आजी तरुणीवर पाळत ठेवायची. आजी ही त्याला मौजमस्तीत अडसर ठरत होती.
बॉडीबिल्डर असलेल्या मितेशला त्याची मैत्रीण प्रेमाने गॅंगस्टर म्हणत होती. घटना घडली त्यावेळी मितेशच्या एका मैत्रिणीनं त्याला वारंवार फोन केले होते. मात्र, तो आजीचा खून करण्यात व्यस्त होता. त्याच्या मैत्रिणीनं गॅंगस्टर, कॉल मी असा संदेश त्याला पाठविला होता. अत्यंत लाडाने वाढलेल्या मितेशला जगण्यासाठी कोणत्याच अडचणी नव्हत्या. मात्र केवळ शराब आणि शबाब याचा नाद लागला होता. आईवडील पैसे कमावण्यात व्यस्त होते. त्यामुळं मुलाच्या वर्तणुकीकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते.
मितेशने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये एका विद्यापीठात प्रवेश मिळवला होता. मात्र त्या शिक्षणासाठी त्याला 1 कोटी 40 लाख रुपयांचा खर्च येणार होता. 40 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते तर उर्वरित एक कोटी रुपये आजीने द्यावेत म्हणून तो तगादा लावत होता. मात्र आजी नकार देत असल्याने त्यांच्यात भांडणे झाली होती. शनिवारी घटनेच्या दिवशी कपडे वाळत घालण्यावरून आजीची आणि नातवाची वादावादी झाली. आरोपीने त्याची आजी देवकाबाई बोबडे यांची हत्या केली. आजीची हत्या केल्यानंतर आपण हत्या केलीच नाही, असा बनाव करण्यासाठी तो नियमित जीमला गेला. मात्र सायंकाळी हत्याकांडाचा उलगडा झाला. पोलिसांना आजी आणि नातू यांच्यातील मतभेदांबद्दल माहिती झाली. त्यांनी तो अँगल समोर ठेवत तपासाला सुरुवात केली. मितेशला अटक केली.