नागपूर : नागपूर महापालिकेत (Nagpur Municipal Corporation) यापूर्वी चार सदस्यीय प्रभाग रचना होती. यंदा तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. त्यामुळे प्रभाग रचना कमी-जास्त प्रमाणात करण्यात आली. प्रभागाच्या नव्या रचनेत भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. शहर काँग्रेसच्या गुरुवारी देवडिया भवन (Devdia Bhavan ) येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भात आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेवर भाजपसह काँग्रेसमधूनही अनेक आक्षेप नोंदविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरातील उत्तर व दक्षिण नागपूर सोडता काँग्रेसकरिता नवी प्रभाग रचना ही अनुकूल नाही. यासंदर्भात आक्षेप असल्यास काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे (MLA Vikas Thackeray) यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांकडे आक्षेप नोंदविण्याचे सांगितले आहे. याव्यतिरिक्त आक्षेप नोंदविण्यासंदर्भात काँग्रेसकडून एक समिती गठीत करण्यात येणार आहे.
या बैठकीत डिजिटल सदस्यता अभियानासंदर्भात माहिती देण्यात आली. प्रभाग स्तरावर निवडणुकीसंदर्भातील चर्चा झाली. नव्या प्रभाग रचनेसंदर्भात माजी व आजी नगरसेवकांकडून सूचना घेण्यात आल्या. नव्या प्रभाग रचनेत पूर्व नागपुरात पूर्वीच्या प्रभागांना तीन भागात विभाजित करण्यात आले. महाल येथे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे जुने घर, संघ मुख्यालय येथून अन्य प्रभाग हे भाजपकरिता सोयीस्कर बनविण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला. आप्पा मोहिते व सुनील दहीकर यांनी यासंदर्भात मत व्यक्त केले. किशोर गीद यांनी दक्षिण नागपूर येथे रिजवान, पश्चिम व सुभाष मानमोडे, वीणा बेडगे यांनीही प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदविले. आशीष दीक्षित यांनी प्रभाग तेरा संदर्भात माहिती दिली. यासंदर्भातील आक्षेप लवकरच नोंदविले जणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.
नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक नगरसेवकांच्या सध्याचा प्रभागांचे विभाजन, त्रिभाजन झाले आहे. अर्थात जुने प्रभाग काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीन वेगवेगळ्या प्रभागात विभागले गेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आराखडा जाहीर करणे, आक्षेप, हरकती, सूचना मागविणे तसेच सुनावणी घेणे आदी कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या प्रारूप अधिसूचनेवर चौदा फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर सोळा फेब्रुवारी रोजी प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर केले जाईल. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकार्यामार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचा अंतिम दि. सव्वीस फेब्रुवारी 2022 असेल. प्रभागाची गणना उत्तरपासून पूर्व, पूर्वपासून पश्चिम, पश्चिमपासून दक्षिण आणि उत्तरच्या क्रमानुसार करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक विधानसभेत सात प्रभाग असतील. एका-एका विधानसभा क्षेत्रात 24 ते 25 नगरसेवक आहेत.