२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाई काय म्हणाले?

| Updated on: Dec 18, 2022 | 5:34 PM

२०२४ मध्ये काय होईल, हे सांगायला मी काही जोतिष्य नाही, असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय.

२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाई काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे
Follow us on

नागपूर : मी प्रदेश अध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेच पाहिजेत, असं वक्तव्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार. बहुमतही मिळणार, असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. कुणीही शिंदे गट आणि भाजपात मतभेद निर्माण करू नये, असंही शंभूराज देसाई म्हणालेत. पुन्हा एकदा २०२४ ते २०२९ चा काळ हा देवेंद्र फडणवीस यांचा आला पाहिजे. राज्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आपण उभे राहिलो पाहिजे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना राज्याचं सर्वोच्च पद मिळालं पाहिजे, अशी अपेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. मी प्रदेश अध्यक्ष असताना ते पुन्हा राज्याच्या सर्वोच्च ठिकाणी गेले पाहिजे. त्यासाठी आपणा सर्वांची जबाबदारी मोठी असल्याचं बावनकुळे म्हणाले.

यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई म्हणाले, २०२४ मध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांचं सरकार येणारचं आहे. बहुमतात आल्यानंतर शिंदे आणि फडणवीस हे बसून जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. तुम्ही आमच्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका.

२०२४ मध्ये काय होईल, हे सांगायला मी काही जोतिष्य नाही, असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय. पुन्हा फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं. त्यानंतर २०२४ मध्ये शिंदे-भाजप सरकार बहुमतात येईल, असं देसाई यांनी म्हंटलंय.

अजित पवार म्हणाले, आमची एकजूट राहावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याकरिता आमचे सर्व वरिष्ठ आणि आम्ही प्रयत्न करतो. परंतु, आम्ही काही जोतिष्य नाही की, पुढच्या २०२४ च्या निवडणुकीत काय होणार आहे. आम्ही जोतिष्याकडं जाऊन पाहणीसुद्धा करत नाही. गुरु काय सांगतो, मंगळ काय सांगतो हे पाहायला आम्ही जोतिष्याकडं जात नसल्याची टीकाही अजित पवार यांनी केली.