नागपूर : उद्धव ठाकरे म्हणाले होते. महाविकास आघाडीत सभ्यता आणि समन्वय होता. माझ्याकडून कुणी माईक खेचला नव्हता. यावर उत्तर देताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासाठी सांगतो. दोन माईक आणून ठेवलेले आहेत. पण, आम्हाला एकच माईक पुरेसा आहे, अशी कोपरखडी देवेंद्र फडणवीस यांनी मारली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिवाळी अधिवेशन दहा दिवस चालेल. १९ चे २९ डिसेंबरपर्यंत. २०१९ नंतर पहिल्यांदाच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होतंय. अधिवेशन किमान तीन आठवडे करण्याची विरोधकांची मागणी आहे. कामकाज सल्लागारांच्या बैठकीत कालावधी वाढविण्यावर निर्णय़ घेण्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हंटलंय.
अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करतो की, नागपुरातील हिवाळी अधिवेशन तीन आठवड्याचं घ्यावं. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अधिवेशन तीन नव्हे चार आठवड्याचं घेता येईल. पण, हा प्रश्न कुणी विचारायचा. त्यांनी एक आठवड्याचंतरी नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतलं असेल, त्यांनी विचारायचा.
चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकताना अजित पवार यांनी सरकारच्या बऱ्याच मुद्यांवर बोट ठेवलं. अधिवेशनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बाहेर गेलेले प्रकल्प, वादग्रस्त विधानं, पीकविम्याचा प्रश्न, लव्ह जिहाद कायदा, शाईफेकीतले गुन्हे असे काही मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.
हे जसं खोके सरकार म्हणून जसं समजलं जात, तसं हे स्थगिती सरकार आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केला. विधिमंडळाच्या कामांना स्थगिती देण्याचं काम या सरकारनं केलं, असंही ते म्हणाले. तर खोक्यांचा ढिग लागला, तर शिखर उंच होईल, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. अजितदादांच्या तोंडून खोक्याची भाषा शोभणारी नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.