नागपूर : अपशब्द वापरल्याबद्दल जयंत पाटील यांना विधानसभेत निलंबित करण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, विधानसभेत विरोधी पक्षाला बोलूचं द्यायचं नाही, असा निर्धार सत्तारुढ पक्षानं केला होता. एकतर्फी सभागृह चालवू नका, असं आम्हाला त्यांना सांगावं लागलं. जो मुद्दा सभागृहात नाही. त्या मुद्द्यावर सभागृहात बोललं जात होतं. भास्कर जाधव यांना बोलू द्या, अशी आमची मागणी होती. ती मागणी मान्य केली नाही. म्हणून एवढा निर्लज्जपणा करू नका, असं म्हंटल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. मी माझ्या जागेवर होतो. शांत होतो. आता शांत आहे. तेवढाच शांत होतो. निर्लज्जपणा करू नका म्हटल्यावर एवढा अपमान कुणाला वाटला.
जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री प्रचंड चिडलेले दिसले. त्यांनी ठरविलं. निलंबित करायचं, केलं. निलंबित झाल्यावर काय. आता जनतेच्या समोर सगळं आहेच. विरोधी पक्षनेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी आक्रमक नव्हतो. मी फक्त सरकारला सल्ला दिला. सत्तारुढ पक्षाकडून १४ जण बोलले. विरोधी पक्षाकडून एखाद्याला तरी बोलायला द्या, अशी विनंती करत होतो.
महाराष्ट्राच्या विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडू दिले जात नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. राज्यपालांपासून काही मंत्र्यांनी महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले. सरकारमध्ये काही घोटाळे केले आहेत. त्याविषयी बोलणं. विदर्भवासीयांचे काही प्रश्न मांडले होते. त्याविषयी बोलायचं होतं. याला कुठंही परवानगी द्यायची नाही, हे या सरकारनं ठरविलं आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
पुढच्या भूमिकेबद्दल जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राची जनता बघते. जनतेवच्या सदसदविवेक बुद्धीवर पूर्ण विश्वास आहे. मी ३२ वर्षे विधानसभेत असताना कोणताही अपशब्द वापरला नाही. मुख्यमंत्र्यांच्या डेक्सच्या बाजूनं शिव्यांची लाखोली वाहिली जात होती. मी त्यावरही काही बोलत नाही. काही गोष्टींकडं दुर्लक्ष करायचं असतं, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.