नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या जोमाने वाढत आहे. तरीही लग्नसंमारंभ धुमधडाक्यात सुरू आहेत. पन्नास पेक्षा जास्त जण लग्नात आल्यास कारवाईचा इशारा मनपा प्रशासनानं दिला होता. तरीही काही ठिकाणी लग्नांमध्ये गर्दी वाढत होती. लग्न संभारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन लॅानवर कारवाई करण्यात आली. शोध पथकाने 75 हजारांचा दंड वसूल केला. लक्ष्मी लॉन, के. आर. सी लॉन गोरेवाडा आणि आमराई लॅानविरुद्ध कारवाई करण्यात आली. कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळं प्रत्येक लॅानकडून 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नुकतेच एक आदेश काढला. लग्नसमारंभात 50 लोकांची उपस्थितीचे बंधन घातले आहे. तसेच मंगल कार्यालय, लॉन मालकांना त्यांच्याकडील आयोजनाची माहिती संबंधित झोनला देणे आवश्यक आहे. मनपाच्या उपद्रव शोधपथकाने यासंबंधीची कारवाई केले आहे. यात मंगल कार्यालय, लॉनमालकाला 15 हजार प्रत्येकी आणि कुटुंब प्रमुखांवर 10 हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणार्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई शुक्रवारी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोधपथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणार्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.
गांधीबाग झोनअंतर्गत इतवारी मार्केट येथील मे. विनोद प्लास्टिक दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपाद्वारे दररोज मनपा कर्मचारी, उपद्रव शोधपथकाचे जवान प्रत्येक बाजारपेठेत, भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा उपयोग करणार्या दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. उपद्रव शोधपथकाने शुक्रवारी नऊ प्रतिष्ठानांवर कारवाई केली. एक लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय उपद्रव शोधपथकाने हनुमाननगर झोनअंतर्गत पूजा कलेक्शन अँड स्टेशनर्स भारत मातानगर, हुडकेश्वर येथून १२ प्लास्टिक पतंग जप्त केल्या.