नागपूर : नागपूर शहरातील चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक तसेच सेवासदन चौक ते गीतांजली चौक या रोडवर अनेक व्यावसायिक जुन्या वाहनांचा व्यवसाय करतात. हे व्यावसायिक विक्रीसाठी ठेवण्यात आलेले वाहन मनमानी पद्धतीने रस्त्यावर पार्क करतात. त्यामुळे येथील इतर वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. यामुळे अपघात सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करून रस्त्यावर वाहनांचा, सर्व्हिसिंग सेंटरचा व्यवसाय करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी पोलीस वाहतूक विभागाला दिले. शहरातील वाहतूक (Transport) समस्या, रस्त्यांवरील अतिक्रमण आदींबाबत महापौरांनी मनपा प्रशासन आणि पोलीस वाहतूक विभागासोबत बैठक घेतली. महाल येथील राजे रघुजी भोसले नगरभवन येथे झालेल्या बैठकीत मनपाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
गांधीबाग झोन अंतर्गत अनेक भागातील मुख्य मार्गांवर वाहन विक्रेते, वाहन दुरूस्ती करणारे, प्रवाशी वाहतूकदार, कापड दुकाने, शनिवार बाजार, इतर व्यवसाय अशा विविध व्यावसायींमुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. गांधीबाग झोन अंतर्गत सेवासदन चौक ते गीतांजली चौक आणि चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक या मार्गावर वाहन दुरूस्ती आणि जुने वाहन विक्रीच्या दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दुकानांमध्ये येणारी वाहने, व्यावसायींची विक्रीची वाहने ही सर्व वाहने रस्त्यावरच उभी ठेवली जातात. त्यामुळे रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ही सर्व वाहने वाहतूक पोलीस प्रशासनाने टोईंग वाहनाद्वारे उचलण्यात यावीत.
वाहन विक्रीशिवाय इतर व्यवसायीकांद्वारेही रस्त्यांवर सामान ठेवले जाते. अशा सर्व व्यावसायीकांवरही सक्तीने कारवाई करून त्यांचे रस्त्यावर ठेवलेले सामान जप्त करण्यात यावे, असेही निर्देश महापौरांनी दिले. गांधीसागर तलावाजवळ रजवाडा पॅलेस ते गंजीपेठ चौक मार्गावर शनिवार बाजार भरविला जातो. या बाजारामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. याबाबत सुद्धा तातडीने दखल घेत बाजारातील दुकानदारांवर सामान जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सेन्ट्रल ऐव्हेन्यूच्या मागच्या भागात अनेक नागरिकांनी पायऱ्या, रॅम्प आदीचे अनधिकृत बांधकाम रस्त्यावर करण्यात आले आहेत. याशिवाय गांधीबाग येथे रस्त्यावरच कपड्याचे मॉडेल उभे ठेवले जातात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतुकीला अडथळा असतो.
नंगा पुतळा चौकावरील मार्गावर पाणीपुरी, चाट, चायनीस फूड आदींच्या अनेक हातगाड्यांचे व्यवसाय चालतात. आधीच्याच वर्दळीच्या या भागात या हातगाड्यांमुळे रस्त्यावर गर्दी होते आणि वाहतूक प्रभावित होते. या हातगाडी व्यावसायीकांना मनपाद्वारे पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि त्यांची अधिकृत नोंदणी करून त्यांना व्यवसायासंदर्भात ठराविक क्रमांक मनपाद्वारे उपलब्ध करून देण्यात यावा. यातून व्यावसायिकांचे व्यवसाय प्रभावित होणार नाही शिवाय यातून मनपाला महसूलही प्राप्त होईल, असेही महापौरांनी सांगितले.