नागपूर : उमरेड (Umred) तालुक्यातील ब्राम्हणी शिवारात अश्लील नृत्य प्रकरणात चंद्रकांत मांढरे, सूरज नागपुरे आणि अनिल दमके यांना अटक करण्यात आली. या तिघांनी ऍलेक्स डान्स शो आयोजित केला होता. कोरोना नियमांचं उल्लंघन, कायदेशीरपणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे आणि अश्लील नृत्य करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अश्लील नृत्य करणाऱ्या नागपुरातील ऍलेक्स डान्स गृपच्या तरुण-तरुणीवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुही, उमरेड तालुक्यांतील काही गावांत डान्स हंगामा सुरु होता. बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी लोकं एकत्र येतात. त्यानिमित्त गावात पाहुणे येतात. या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी (Entertainment) विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नाटक, दंडार, ड्रामा, लावणी अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशातच ग्रामीण भागात डान्स हंगामाचं (Hungama) आयोजन केलं गेलं. येथे तोकड्या कपड्यांमध्ये महिलांचा डान्स सुरू होता. मुकळगाव, भुगाव, सिल्ली तसेच ब्राम्हणी या गावांमध्ये अशाप्रकारचे डान्स आयोजित केले होते.
तोकड्या कपड्यामध्ये डान्स सुरू असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ माजली. ही का आपली संस्कृती अशी ओरड सुरू झाली. शंभर रुपयांत युवकांचे हा महिला मनोरंजन करत होत्या. शंकरपटाच्या नावाखाली चाललेला हा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी काहींनी केली. माध्यमांत या प्रकाराचे वृत्त व्हायरल होताच प्रशासन कामाला लागले. हे सारे अवैधपणे सुरू होते. त्यामुळं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारल्याचं आता प्रशासन सांगत आहे.
डान्स हंगामाचे आयोजन करणारे ब्राम्हणी येथील तीन जणांना अटक करण्यात आली. चंद्रशेखर मांढरे, सूरज नागपुरे आणि अनिल दमके अशी या आयोजकांची नावे आहेत. वृत्त प्रकाशित होताच ब्राम्हणी शिवारात पोलिसांनी चौकशी केली. सतरा जानेवारीला शंकरपट होते. यानिमित्त डान्स शोचे पत्रक लावण्यात आले होते. पत्रकात संपर्कासाठी मोबाईल नंबर दिला होता. या नंबरवर डान्स हंगामा बुकिंगसाठी संपर्क साधावा, असं लिहिलं होतं. यावरून पोलिसांनी आयोजकांशी संपर्क साधला. वेगवेगळ्या कलमान्वये आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
डान्स हंगामाचे आयोजन करणारे नागपूरमधील होते. पत्रकात एलेक्स जुली के हंगामे असे लिहिले होते. त्यामुळं ही एलेक्स जुली कोण अशी चर्चा रंगली आहे. आता पोलिसांनी सादरीकरण करणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. व्हायरल व्हिडीओबाबत कारवाई सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करू, असे उमरेडचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी सांगितलं.