नागपूर : पुढच्या निवडणुकीत ५२ आमदार निवडून आणणार, असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू म्हणाले, त्यांचं आडनाव ५२ असल्यानं त्यांनी ५२ आमदार निवडून आणणार असं सांगितलं असेल. प्रहारसुद्धा विदर्भात दहा आमदार निवडून आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आमचे दहा आमदार आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. टीव्ही ९ मराठीशी ते बोलत होते.
बच्चू कडू यांनी सांगितलं की, चंद्रशेखर बावनकुळे यांची जादू किती चालणार आहे. ते बघू. सरकारच्या अडीच वर्षांच्या कामगिरीवर बरचं काही अवलंबून आहे. विदर्भात सर्व खासदार निवडून आणू असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, शिंदे-भाजपची सरकार असल्यामुळं कदाचित ही जादू होऊ शकते.
२०२४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतील, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, भविष्यवाणी करण्यात काही अर्थ नसतो. जर तर मध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही. येणारी परिस्थिती कशी आहे, त्यावर बरेच काही अवलंबून असते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. किंवा एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. प्रहार या लहान पक्षाचापण मुख्यमंत्री होऊ शकतो. आम्हीपण म्हणू शकतो. येणाऱ्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो. पण, याला काही अर्थ नाही.
हे सर्व त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. विदर्भही महाराष्ट्रात आहे. सीमावाद जास्त महत्त्वाचा आहे. टीव्हीवाले जास्त न्यूज दाखवितात. त्याचं प्रतिबिंब आता विधानसभेत दिसायला लागलं. तुम्ही आता विदर्भातले मुद्दे घ्या. विदर्भातले हे मुद्दे चर्चेला येणार का. तुमच्या मीडियावर बरचं काही अवलंबून आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.