नागपूर : नागपुरातील सूर्याचा अस्त झाला. हा सूर्या म्हणजे पोलीस दलात कार्यरत असलेला सूर्या नावाचा कुत्रा होय. कुत्र्याच्या मृत्यूची बातमी होऊ शकते का, तर हो. हा कुत्रा विशेष होता. कारण यानं बाँब शोधण्यासाठी नागपूर पोलीस दलात काम केलंय. त्यामुळं या सूर्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारही करण्यात आलेत.
सूर्या हा कुत्रा नागपूर पोलीस दलात कार्यरत होता. पण, गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्याला मूत्रपिंडाचा त्रास होता. त्यावर उपचारही सुरू होते. पण, तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सूर्या हा नागपूर पोलीस दलात कार्यरत होता. बॉम्बशोधक पथकात त्याने महत्वपूर्ण कामगिरी बजावली. गेली 10 वर्षे महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवा दिली. सूर्याने नागपूर, गोंदिया, गडचिरोली सह अन्य भागात काम केलंय. सूर्यावर नागपूर पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात अंतिम संस्कार पार पडले.
सूर्याच्या मृत्युमुळं पोलीस दलाची फार मोठी हानी झाली आहे. कुठेही बाँब शोधण्याचे काम करायचे असले म्हणजे सूर्याची मदत व्हायची. त्याची देखभाल करणारे पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील काकडे यांनी सूर्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. तसेच सूर्याच्या मुत्यूमुळं नागपूर पोलीस दलही दुःख व्यक्त करत आहे.
काय शोधायचं आहे यानुसार या कामात वेगवेगळ्या प्रजातीच्या (ब्रीड) कुत्र्यांचा उपयोग केला जातो. त्याप्रमाणेच त्यांना प्रशिक्षित केलं जातं. सामान्यपणे सैन्यात जर्मनशेफर्ड, लेब्रोडोर, बेल्जियन शेफर्ड्स आणि ग्रेट स्विस माऊंटेन या प्रजातीच्या कुत्र्यांचा उपयोग होतो. भारतीय प्रजातींमध्ये (ब्रीड) मुधोल हाऊंडचाही उपयोग श्वान पथकात शोध मोहिमेसाठी होतो.