नागपूर : सुपर मार्केटमध्ये (Super Market) वाईन विकण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध नागपूर चिल्लर व्यापारी संघाने (Chiller Traders Association) केलाय. सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवणार नाही, नशेला प्रोत्साहन देणार नाही, असं व्यापारी संघाचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक (Dnyaneshwar Rakshak) यांनी म्हटलंय. थोड्याशा नफ्यासाठी तरुणांना नशेच्या आहारी नेणार नाही, असं रक्षक यांचं म्हणण आहे. वाईन विकल्यास सुपर मार्केटमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं येतील. त्यामुळं सुपर मार्केटमध्ये गुन्हेगारी वाढू द्यायची नाही. सुपर मार्केटवर सरकारच्या निर्णयाच्या निषेधाचे फलक लावणार, असल्याचंही रक्षक म्हणाले. सुपर मार्केटमध्ये युवक रोजगार मागण्यासाठी येतात. रोजगार मागणाऱ्या तरुणांच्या हाती वाईनची बाटली का द्यायची, असा सवाल व्यापारी संघाच्या वतीनं नागपुरात विचारण्यात आलाय.
राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. एक हजार स्वेअर फुटच्यावर असलेल्या सुपरमार्केटच्या बाजूला स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वाईनरी चालत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं. सरकार चालविण्यासाठी पैसे लागतात. ते पैसे गोळा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महसुलात वाढ झाल्यास विकासकामे करता येईल, असा सरकारचा युक्तिवाद आहे.
वायनरी ही फल उत्पादनावर चालते. त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. सुपरमार्केटमध्ये एक स्टॉल निर्णाम करण्यात येणार आहे. गोव्यात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने हे धोरण अमलात आणले आहे. तिथं भाजपा विरोध का करत नाही, असा टोलाही नवाब मलिक यांनी विरोध करणाऱ्या भाजपाला लगावला.