नागपूर : संघाच्या मुशीत घडलेले छोटू भोयर हे भाजपचे नगरसेवक आहेत. परंतु, त्यांनी रविवारी रात्री पक्षाचा राजीनामा दिला. भाजपामध्ये बाहेरून येणाऱ्यांना संधी मिळाली. भाजप नेत्यांकडून वारंवार अपमान केला जातो, असा आरोप करत त्यांनी भाजपला रामराम ठोकला.
गेले काही दिवस नॅाटरीचेबल असलेले भाजपचे नगरसेवक छोटू भोयर आज टीव्ही ९ मराठीच्या कॅमेऱ्यासमोर आलेत. भाजपमध्ये बाहेरुन आलेल्यांना संधी मिळाली. भाजप नेत्यांकडून वारंवार अपमान केला जातोय. पक्षात मोठी खदखद आहे, असे आरोप करत छोटू भोयर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. आज काँग्रेसमध्ये प्रवेश करून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात विधान परिषद निवडणूक लढणार, असंही छोटू भोयर यांनी सांगितलं.
विधान परिषद नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी भाजपकडून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव जाहीर झालं. दुपारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसकडून राजेंद्र मुळक यांना उमेदवारी देण्याची शक्यता होती. ते स्वतः यासाठी इच्छुकही आहेत. परंतु, त्यांच्या नावाला क्रीडा मंत्री सुनील केदार आणि पालकमंत्री नितीन राऊत यांची पसंती नसल्याचं कळते. त्यामुळं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेदवारी देण्यावरून पेचात सापडलेत.
छोटू भोयर हे सुनील केदार आणि नितीन राऊत या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात होते. भोयर यांना उमेदवारी दिली तर भाजपचा शहरातला एक मोठा गट फुटू शकतो, असे काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांना वाटतंय. भोयर यांना नाना पटोले यांची शनिवारी भेटही घेतली होती. या भेटीनंतर पटोले हे मुंबईला निघून गेले. उमेदवारी ठरविण्याची जबाबदारी राऊत-केदारांवर सोपविल्याची माहिती आहे. यानंतर छोटू भोयर यांना काँग्रेस प्रवेश निश्चित झाला. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी देवडिया या काँग्रेस भवनात सोमवारी बैठक बोलावली आहे. याठिकाणी पक्षप्रवेशानंतर छोटू भोयर यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषित केली जाऊ शकते.
काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची फौज आहे. परंतु, त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांना टक्कर देणारा सक्षम नेता मिळाला नाही. राजेंद्र मुळकांच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळं छोटू भोयर यांना भाजपातून आयात करावे लागले. यामुळं भाजपाची मते विभागली जातील, असा काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे.