वर्धा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही विशिष्ट प्रकारची निवडणूक (Election) होती. महाविकास आघाडीकडे तीन जागा होत्या. भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेना युतीकडं दोन जागा होत्या. कोकणातली जागा आपण जिंकली. नाशिकची जागा भाजप आणि शिवसेनेच्या मदतीने जिंकण्यात आली. ज्याकाही जागा यायला पाहिजे होत्या त्या आल्या नाहीत. याची कारण मिमांसा केली जाईल. विचार करून त्यात सुधारणा केली जाईल.
जुन्या पेंशनच्या बाबतीत शिक्षण विभाग काम करतोय. त्यावर नक्की विचार सुरू आहे. हे सरकार सर्व घटकांना न्याय देणारं आहे. विकासावर भर देत आहोत. कर्मचाऱ्यांच्या समस्याची सोडविणार आहोत. शिक्षकांसाठी ११ शे कोटी रुपये दिलेत. शिक्षक हे आमचेच आहेत. त्यामुळं त्यांनी याचाही विचार केला पाहिजे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
बच्चू कडू हे महाविकास आघाडीत अस्थिरता आहे म्हणाले. आमच्याकडं १७० आमदार आहेत. त्यामुळं हे सरकार स्थिर आहे, हे सांगण्याची मला आवश्यकता नाही. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. या राज्यातील जनतेला न्याय देईल. पुढच्या निवडणुकीतदेखील हे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाच्या पाठीशी हे सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. त्यावरही सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची फौज उभी करणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
बापुकुटीला भेट दिल्यानंतर त्यावेळचा काळ आठवला. त्यांच्या वस्तू, आठवणी आहेत. समर्पित भावनेने त्यांनी लोकांनी सेवा केली. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जागेला भेट देण्यासाठी हजारो लोकं येतात. त्यांना प्रेरणा मिळते.
वर्धा येथील विकासकाम केली जातील. शिवाय लेझर शोच्या माध्यमातून महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा इतिहास दाखविण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं.