नागपूर : शिवसेना अभियानाअंतर्गत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे नागपुरात आहेत. आजपासून त्यांनी विदर्भ दौरा सुरू केला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा घेणे चूक होती. नवाब मलिक यांचाही राजीनामा घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपनं जनाब काय आहे, याचा विचार केला पाहिजे. जनाब बाळासाहेब ठाकरे असं म्हणून होणार नाही. या देशात 22 कोटी मुसलमान राहतात. त्यातले हजारो मुसलमान हे भाजप आणि शिवसेनेला मतदान करतात. येथे आरएसएसचं मुख्यालय आहे. त्यांच्याकडं आदरानं पाहतो. काही काळातील वक्तव्य पाहिलीत तर त्यांनाही जनाब म्हणालं काय, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. मुसलमान, हिंदूंचा डीएनए सारखा आहे. म्हणून डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) हे जनाब सेनेचे प्रमुख झाले का? मोहन भागवत यांना जनाब संघ अशी उपमा देणार का?, असंही राऊत म्हणाले.
देशात राज्यपाल मुसलमान आहेत. जीनांनी देशाची फाडणी केली होती. तुम्ही अनेकदा फाडणी करता, असा टोलाही भाजपला लगावला. एमआयएमशी कधीच युती करणार नाही. भाजप आणि एमआयएम यांची युती आहे. आम्हाला ऑफर देण्याचं नाट्य घडविलं गेलं, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत म्हणाले, संघ आमचे मार्गदर्शक आहेत. आम्ही संघाच्या नेत्यांना भेटणार. त्यात चुकीचे काय.
शिवसेना अभियानाअंतर्गत खासदार संजय राऊत चंद्रपूरला जाणार आहेत. चंद्रपुरात जलशिवार योजनेत महाघोटाळा झाल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडं करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयात चौकशी सुरू आहे. कारवाई झालेली दिसेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. येत्या महापालिका निवडणुका या महाविकास आघाडीनं एकत्र निवडणुका लढाव्यात, अशी इच्छा आहे. पण, यावर शिक्कामोर्तब झाले नाही तर शिवसेना स्वबळावर निवडणुका लढेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. भगवा शिवसेनेचा आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मोठे नेते आहेत. भाजप हा त्यांचा पक्ष आहे. त्यांनी स्वबळावर निवडणूक नक्की लढवावी. वेळ आल्यास आम्हालाही स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.