नागपूर : विदर्भात फार जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे. वर्धा सर्वात जास्त बाधित झाला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यामध्ये ही जास्त पाऊस झाला आहे. तिथेही पूर आहे. ही आपात्कालीन परिस्थिती आहे. आम्ही सर्व अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहोत. मी स्वतः वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. आज नागपूर विभागातील (Nagpur Division) अधिकाऱ्यांची (Officer) बैठक ही घेणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे रात्री साडेआठच्या सुमारास आगमन झाले. फडणवीस आज वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करतील. नागपूर विमानतळावर उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. आमदार आशिष जयस्वाल, समीर कुणावार, कृष्णा खोपडे यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नागपूर येथे यासंदर्भात विभागस्तरीय आढावा बैठक घेतील.
वर्धा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराने वेढले आहे. देवळी तालुक्याच्या सोनोरा ढोक येथे सुद्धा पुराच्या पाण्याने शिरकाव केला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. मागील दहा दिवसात दुसऱ्यांदा गावात पाणी शिरल्याने नागरिक संकटात सापडले आहे. नागरिकांकडून आता गावाचे पुनर्वसन करा अशी मागणी केली जाते आहे. सोनोरा ढोक या गावात पाणी शिरल्याने तेथील जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे.
गावाच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हळविण्यात आले आहे. या पावसामुळे अनेक घरांची पडझड सुद्धा झाली आहे. गावातीलच लेंडी नाला आणी लाडकी नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीपासूनच घरात पाणी शिरायला सुरवात झाल्याने नागरिकांनी घराच्या उंच ठिकाणी जातं स्वतःला सुरक्षित ठेवले. नऊ जुलैला यापूर्वी आलेल्या पावसामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. आता गावकऱ्यांकडून गावाचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केली जातं आहे.
चिमूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे उमा नदीला पूर आला. उमा नदीच्या पुरामुळे पुढच्या भागातील पूल पाण्याखाली गेला. मूल-चामोर्शी मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली. जिल्ह्यातील अनेक मार्ग पुराच्या पाण्याने बंद असताना हा मार्ग बंद झालेत. गडचिरोली जिल्ह्यात जाणारा आणखी एक मार्ग बंद झाला. पोलिसांनी बंदोबस्त लावून दोन्ही बाजूला वाहनधारकांना वाहतुकीस मनाई केली. चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यातील वर्धा- वैनगंगा- उमा नद्यांनी पात्र सोडले आहे.
शहरालगतच्या इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे 0.50 मीटर्सने उघडले आहेत. यामुळे इरई नदीत पाणीपातळी वाढून शहराच्या सखल भागातील पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पुराचे ताजे संकट चिमूर शहर व आसपास केंद्रित झाले आहे. संततधार पाऊस आणि उमा नदीने पात्र सोडल्याने चिमूर शहराच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. टेलिफोन एक्सचेंज- तहसील कार्यालय, माणिकनगर या भागात पुराची तीव्रता अधिक आहे. चिमूरला सध्या बेटाचे स्वरूप आले आहे. चिमूर ते वरोरा आणि चिमूर ते कांपा हे मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले आहेत. प्रशासन पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सक्रिय झाले आहे.