सुनील ढगे, नागपूर : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नागपुरात पोहचले. त्यांनी हिवाळी अधिवेशनासंदर्भात आढावा घेतला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा अहवाल येत्या 15 दिवसांत सादर करण्याचे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दिले. 19 डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर गुरुवारी नागपुरात पोहचले. नागपूरच्या विधान भवनात यासंबंधी नार्वेकर यांनी आढावा बैठक घेतली.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशनाचे आयोजन होऊ शकले नव्हते. याशिवाय रविभवन, नागभवन येथे कोव्हिड केयर सेंटर होते. विधानभवनात सर्व सोयीसुविधा तपासून आवश्यक बदल करण्याच्या सूचना नार्वेकर यांनी दिल्या. इंटरनेट स्पीड अपग्रेड करावे, अध्यक्षांचे दालन, आमदार निवास यासह इतर सर्व निवासांची नूतनीकरण करण्याच्या सूचना राहुल नार्वेकर यांनी दिल्या.
सभागृह परिसरातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती आदी पीठासीन अधिकाऱ्यांसह मंत्र्यांच्या दालनातील आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा तपासून घेतल्या. अपेक्षित बदल, दुरुस्ती, डागडुजी करावी. काही ठिकाणी आवश्यक असल्यास नवीन यंत्रणा बसवावी. सभागृहातील विद्युत व आसन व्यवस्था, ध्वनिक्षेपण यंत्रणा, स्वच्छतागृहे आदी सुविधांबाबत आवश्यक ती कामे करण्यात यावीत, असे आदेश नार्वेकर यांनी दिले.
बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी नागपुरात दाखल होतात. या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक ती निवासव्यवस्था आणि पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधांचा काटेकोर आढावा घेतला.
शहरात येणाऱ्या लोकप्रतिनिधींसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोणतीही अव्यवस्था सहन करावी लागणार नाही. यासाठी सजग राहून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी बजावले.
160 गाळ्यांमध्ये चालणारी पाणी तापविण्यासाठी असणारी डिझेलवरील गिझर यंत्रणा ही प्रदूषण वाढविणारी होती. मात्र आता अद्ययावत आणि पर्यावरणस्नेही यंत्रणा बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या बैठकीत सादरीकरण केले.