नागपूर : मार्च संपला. एप्रिलला सुरुवात झाली. आता उन्हाचे चटके विदर्भात आणखी (Summer clicks in Vidarbha) वाढणार आहेत. एप्रिल महिन्यात तापमान 44-45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. मार्चमध्ये सूर्य डोक्यावर असतो. त्यानंतर सूर्य मध्य प्रदेश, राजस्थानकडं सरकत जातो. एप्रिल महिन्यातील तापमान यापूर्वी 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेले आहे. 2009 मध्ये 30 एप्रिलमध्ये नागपूरचे तापमान 47.1 डिग्री सेल्सिअस होते. 2019 मध्ये अकोल्याचे तापमान 47.2 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. भौगोलिक परिस्थितीनुसार (Geographical conditions) विदर्भ हा संवेदनशील भाग आहे. भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) नोंदीनुसार, एप्रिलमध्ये तापमान वाढते. 40-42 डिग्री सेल्सिअसवरून ते 45-46 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचते. रात्रीचे तापमान 22 ते 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. तर दिवसा याच तापमानात वाढ होते. एप्रिलपाठोपाठ मे महिनाही तापमान वाढणार आहे.
एप्रिलमध्ये जसे चटके बसतात, तसे तापमान खाली आल्याच्याही नोंदी आहेत. 1937 मध्ये विदर्भात पाऊस पडला होता. 1 एप्रिल 1968 मध्ये नागपूरचे तापमान 13.9 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. अकोल्यामध्ये एक एप्रिललाच 1905 मध्ये तापमान 11.1 अंशांपर्यंत खाली आले होते. गेल्या दहा वर्षांचा विचार केल्यास एप्रिलमध्ये नागपूरचे तापमान 43 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर अकोल्याचे तापमान 43 ते 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. त्यामुळं यंदाही तापमान 42 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.
नागपुरात पुढील आठवड्यात 40 ते 41 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं नोंदविला आहे. पुढील आठवड्यात चंद्रपुरात 40 ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत जास्तीतजास्त तापमान राहील. अकोल्यातही येत्या आठवड्यात जास्तीत-जास्त तापमान 40 ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर अमरावतीमध्ये 40 ते 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत जास्तीत-जास्त तापमान राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.