नागपूर : काटोल तालुक्यातील मेंढेपठार-लाखोळी रेल्वे परिसरातील रेल्वे रुळाचे काम सुरू आहे. येथे काम करणार्या दोन महिला मजुरांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी काटोल रेल्वे पोलिस हद्दीत घडली. खुंटाबा येथील शोभा शिवचरण नेहारे (वय ५२) व वाघोडा येथील प्रभा प्रल्हाद गजभिये (वय ५0) असे मृत महिलांची नावे आहेत.
शोभा, प्रभा व इतर मजूर रेल्वे पटरीवर पेटिंग व गिट्टी बाजूला करण्याचे काम करत होत्या. अचानक आलेल्या एक्स्प्रेस गाडीने महिला गडबडल्या. काही लगेच बाजूला हटल्या. त्यात एक महिला बाजूला होत असताना बचावली. पण, शोभा आणि प्रभा या गाडीखाली आल्या. त्यामुळं दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
मध्य रेल्वेच्या वतीने नागपूर-दिल्ली तिसर्या लाईनचे काम सुरू आहे. या कामावर कंत्राटदाराने स्थानिक मजुरांना ठेवले आहे. यातून काटोल तालुक्यातील बहुसंख्य महिला कामावर नियमितपणे आहे. परंतु, मजुरांना कामावर सुरक्षितेसंबंधी सूचना, विशिष्ट कामावरील गणवेश, हेल्मेट आदी पुरवठा करणे आवश्यक आहे. ज्या ट्रकवर रेल्वे धावत आहे. त्यासंबंधी सूचना कामावरील व्यवस्थापकांनी मजुरांना देणे आवश्यक आहे. रेल्वे स्टेशनमार्फत रेल्वे चालकाला काम सुरू असल्याचे भ्रमणध्वनीद्वारा सूचना देणे आवश्यक आहे. यातील मजुरांना सूचना न मिळाल्याने ही दुर्घटना घडली. याबाबत कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल्वे स्टेशन मास्टरांना दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीने शनिवारी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणलेला मृतदेह घेण्यास आलेल्या पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. रेल्वे अधिकार्यांच्या भेटी घेतल्या. संबंधित कंत्राटदारांना कुटुंबीयांची कैफियत सांगितली. पीडितांना मोबदला देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. वंचित आघाडीचे जिल्हा पदाधिकारी दिगांबर डोंगरे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन छेडण्यात आले होते.