नागपूर : नागपूरसह विदर्भात (Vidarbha) आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता नाही. हवामान (Weather) विभागाने हा अंदाज वर्तवलाय. तर विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील 2 दिवस दिवसांत हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. शिवाय येत्या दोन दिवसांत तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. दोन दिवसांपूर्वी विदर्भाच्या काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. शिवाय आणखी दोन दिवस मुसळाधार पावसासह येलो अलर्ट दिला होता. पण तो अलर्ट आता काढण्यात आलाय, अशी माहिती हवामान विभागाच्या एस भावना यांनी दिली.
मंगळवारी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. जिल्ह्यातून प्राथमिक अहवाल मागविण्यात आला आहे. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार हे गारपीटग्रस्त भागात जाऊन आज दौरा करणार आहेत. सुनील केदार यांच्या दौऱ्यात ते नागपूर तालुक्यातील बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी तालुक्यातील गुमती, लोणखेरी, खापा, सावनेर तालुक्यातील दहेगाव पारशिवनी तालुक्यातील इटगाव भागीमहारी रामटेक तालुक्यातील जमुनिया, टुयापार, घोटी, फुलझरी आदी गावांना भेटी देणार आहेत.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी महसूल यंत्रणेला यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. काल सायंकाळी उशिरा रामटेक, सावनेर, नागपूर ग्रामीण, कामठी, पारशिवनी, या तालुक्यात झालेल्या नुकसानीची आकडेवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाली. जवळपास सात हजार 431 हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस, गहू, हरभरा, तूर, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. आठ हजार 334खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला. दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे.