नागपूर : वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. टाटा एअरबस हा प्रकल्प नागपूरमध्ये येणार असल्याचं प्रस्तावित होतं. पण हा प्रकल्प आता गुजरातच्या बडोदा येथे हलविण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. संबंधित प्रकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातील रामगिरी या शासकीय निवासस्थानाबाहेर घडला.
नागपुरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थानाबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. युवक काँग्रेसच्या या आंदोलनामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना काही कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावं लागलं. विशेष म्हणजे आंदोलकांनी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थान असं लिहिलेल्या पाटीवर गुजरातचे मुख्यमंत्री असं लिहिण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान अतिशय गदारोळ झाला.
आंदोलक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. “एकनाथ शिंदे हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. आधी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प आणि आता एअरबस प्रकल्प, असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जात आहेत. हे फक्त खोके मुख्यमंत्री आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. इथे गुजरातचे सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे”, अशी टीका आंदोलक कार्यकर्त्यांनी केली.
युवक काँग्रेसचे नेते कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जवळपास 25 ते 30 कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी बंगल्याबाहेर ‘गुजरातचे मुख्यमंत्री’ अशी पाटीदेखील लावण्याचा प्रयत्न केला. पण काही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.