कोल्हापूर: अजित (ajit pawar) आता खूप बदलला आहे. तो बोलताना आता विचार करून बोलतो. प्रत्येक शब्द जपून बोलतो. शब्दांना जपतो. कुणाला दरडवायचं असेल तर विचारपूर्वकच दरडावतो, असं सांगतानाच हसन मुश्रीफ (hasan mushrif) तुम्ही सिनेमात काम करा. मी तुमच्या कागलमधून निवडणूक लढवतो, अशी जोरदार फटकेबाजी अभिनेता नाना पाटेकर (nana patekar) यांनी केली. निमित्त होतंकागल शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ज्योतिबा फुले आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा अनावरण समारंभाचं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते. अजितदादा, मुश्रीफ आणि नाना पाटेकर हे तिघेही जिगरी दोस्त. तिघे बऱ्याच वर्षानंतर एका मंचावर आले होते. नाना पाटेकर यांनी हे निमित्त साधून किस्से साांगत जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये वारंवार हशा पिकत होता.
आज कोल्हापुरात पुतळ्यांचे नाही तर विचारांचे अनावरण झाले आहे. माणसं गोळा करण्यावर टॅक्स असता तर मुश्रीफ हायेस्ट टॅक्स भरणारे असते. आता मुश्रीफ जरा तुम्ही सिनेमात काम करा. मी तुमच्या कागलमधून निवडणूक लढतो. तुम्ही सांगितलं की मी आरामात निवडून येऊ शकतो. सगळे पुतळे आपल्या मनात असायला पाहिजे. नुसते पुतळे उभा करून काय होणार?, असं नाना पाटेकर म्हणाले.
मुश्रीफ इतके गोंडस आहेत की मर्फीच्या जाहिरातीमधील मुलगा हा मुश्रीफच होते की काय असं वाटतं. पुढच्यावेळी सुद्धा मुश्रीफ साहेब निवडणुकीसाठी उभा राहिले की प्रचाराची गरज नाही, असंही त्यांनी सांगितलं. इतके लोक बघितल्यावर बोलण्याऐवजी नाटक करावं असं वाटतं. आज असं झालंय की आखाड्यात येऊन कुस्ती न खेळणं किती योग्य आहे? असं नानांनी सांगताच एकच खसखस पिकली.
पूर्वीचे अजितदादा आणि आताचे अजितदादा यात खूप बदल झालाय. आता अजितदादा बोलताना देखील काळजी घेऊन बोलतात. झाडतात ते देखील योग्य शब्दात, असं ते म्हणाले.
आज अशोक सराफ यांचा 75 वा वाढदिवस आहे. आज खरं तर मी आज तिथं असायला पाहिजे होतो. पडत्या काळात अशोक सराफ यांनी मला खूप जपलं आहे. अशोक सराफ यांना 250 रुपये मिळायचे आणि मला 50 रुपये मिळायचे. त्यावेळी आम्ही शुटिंग संपल्यावर आम्ही पत्ते खेळायचो. तेव्हा अशोक सराफ मुद्दाम हरायचे. मला पैसे मिळावेत आणि माझी कडकी भागावी म्हणून ते असं करत होते, असंही त्यांनी सांगितलं.