मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात ( OBC reservation in local body) आले, याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी वरील भाष्य केले. ते पत्रकारांशी बोलत होते. (Nana Patole criticized Devendra Fadnavis and BJP after the cancelation of OBC reservation in local body by supreme court)
यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर टीका केली. “कोर्टाने वारंवार सांगूनही केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करून आकडेवारी दिली नाही. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केले. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली असली तरी आता राज्य सरकारने हा विषय घटनापीठापुढे घेऊन गेले पाहिजे आणि ओबीसी समाजाला न्याय दिला पाहिजे. तशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे,” असे नाना पटोले म्हणाले.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, “ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे हे प्रकरण कोर्टात असताना कोर्टाने केंद्र सरकारला ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती आहे, याची आकडेवारी मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ती दिली नाही. ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती हे कळले पाहिजे असे कोर्टाने सांगूनही भाजप सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, आकडेवारी दिली नाही. कोर्टाने 1931 ची लोकसंख्या लक्षात घेऊन हा निकाल दिला आहे.” तसेच पुढे बोलताना यामागे ओबीसी समाजाला राजकीय व्यवस्थेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. “घटनेच्या कलम 340 नुसार इतर मागास वर्गाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकार मिळाले आहेत. पण केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय केला जात आहे. यातील वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे. पण ते जाणीवपूर्क खोटे बोलून दिशाभूल करत असून त्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. ओबीसींच्या पाठिंब्यावरच भाजपला केंद्रात व राज्यात सत्ता मिळाली. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात समांतर आरक्षणाचा निर्णय घेत ओबीसींच्या रिक्त जागांची भरती केली नव्हती. त्यामुळे त्यांना ओबीसींचे आरक्षण संपवायचे होते हे स्पष्टच आहे. आता फडणवीस खोटे बोलून राजकारण करून त्यांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे पाप लपवण्याचे काम करत आहेत,” असेही पटोले म्हणाले. (Nana Patole criticized Devendra Fadnavis and BJP after the cancelation of OBC reservation in local body by supreme court)
इतर बातम्या :
ओबीसींची सरसकट जनगणना करा आणि आरक्षण द्या; ओबीसी जनमोर्चाची मागणी
शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का नाही? : छत्रपती संभाजीराजे
(Nana Patole criticized Devendra Fadnavis and BJP after the cancelation of OBC reservation in local body by supreme court)