रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या (Nanar project) समर्थनार्थ घडामोडींना वेग आला आहे. रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी 3 जानेवारी 2021 रोजी नाणार प्रकल्पाबाबत एक मोठं विधान केलं होतं. त्यांनी नाणार प्रकल्पासाठी जमिनी खरेदी-विक्रीचे करण्यात आलेले सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) भेटीसाठी वेळ मागितल्याने प्रशाकीय पातळीवर नेमंक काय घडत आहे; हा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच नाणार प्रकल्पाविषयी तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. (Nanar project supporters demands time to meet chief minister Uddhav Thackeray)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर उभारण्यात येणाऱ्या नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता. शिवसेनेच्या विरोधामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकल्पाला स्थगिती द्यावी लागली होती. त्यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारच्या कार्यकाळाततरी नाणार रिफायनरी प्रकल्पाचे काम सुरु व्हावे अशी अपेक्षा नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आता नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ अनेक घडामोडी घडत आहेत. रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मुख्य़मंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. या समन्वय समितीमध्ये एकूण 45 संघटाना आहेत. विशेष म्हणजे समितीने आपल्या लेडरहेडवर पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना वेळ मागितल्याचे समितीचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांनी सांगितले आहे. समितीच्या या मागणीनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी ज्या जमिनींचे खरेदी व्यवहार झाले होते, ते सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचे यापूर्वी विनायक राऊत यांनी सांगितले होते. “नाणार प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी 7 लाख रुपये एकराने त्यांच्या जमिनी विकल्या. हा प्रकल्प झाला तर त्याचे मूल्य 90 लाख एकरी होणार आहे. दलालांनी जमिनी लाटून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. 224 गुजराती आणि मारवाडी लोकांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द करण्यात येईल,” असं राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाणार प्रकल्प समर्थन समन्वय समितीला भेटण्यासाठी वेळ देतील का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
(Nanar project supporters demands time to meet chief minister Uddhav Thackeray)