विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. मात्र येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होईल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. अशात अनेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही मंत्रिपद मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतील. मला आशीर्वाद देतील, असा मला विश्वास आहे, असं बालाजी कल्याणकर यांनी म्हटलं आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे आहे. सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलताना कल्याणकर यांनी मंत्रिपदाबाबतची इच्छा बोलून दाखवली आहे. नांदेड उत्तरच्या जनतेने मला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी आभार मानतो. 50 वर्षात झाला नाही. तेवढा विकास नांदेड उत्तर मतदारसंघात शिंदेसाहेबांमुळे झाला आहे. जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा आम्ही शिंदे साहेबांच्या पाठीशी होतो. साहेबांनी जो मला शब्द दिला तो साहेब पूर्ण करतील हे मी 100% सांगतो, असं कल्याणकर म्हणाले आहेत.
कार्यकर्त्यांची भावना आहे आमदार बालाजी कल्याणकर मंत्री झाले पाहिजेत. आमची सगळ्यांची भावना आहे ती एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत. लाडक्या बहिणींची भावना आहे की शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं बालाजी कल्याणकर म्हणालेत. पूर्वी गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीससाहेब यांच्याकडे होतं. महायुतीचे मोठे नेतृत्व शिंदे साहेबाला न्याय देतील हे सांगतो, असं म्हणत कल्याणकर यांनी गृमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असं वारंवार म्हणण्यात येत आहे. यावरही बालाजी कल्याणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी सगळ्यांचीच भावना आहे. कार्यकर्त्यांची भावना आहे की आमदार बालाजी कल्याणकर मंत्री व्हावेत अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत…. तिघांचं सरकार आहे सर्व पक्ष एकत्र येऊन ठरवत असतात. येणाऱ्या मुख्यमंत्र्याला मी शुभेच्छा देतो, असं कल्याणकर म्हणाले आहेत.