राजीव गिरी, नांदेड : पंजाब (Punjab) पोलिस स्टेशनवर शस्त्रधारींच्या हल्ल्यानंतर देशभरात खळबळ माजवून देणारं नाव म्हणजे अमृतपाल सिंग (Amrutpal singh). गेल्या १८ मार्चपासून पंजाबसह देशभरातील पोलिसांसाठी तो मोस्ट वाँटेड आहे. ७ राज्यातील पोलिसांसह राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहेत. नांदेडमध्येही अमृतपाल सिंग याचे समर्थक आहेत. त्यामुळे अमृतपाल सिंग महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणूनच नांदेड पोलीस गेल्या आठवडाभरापासून हायअलर्टवर आहेत. मागील दोन दिवसांपासून विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात असून अमृतपालच्या वारीस दे पंजाब या संघटनेच्या सदस्यांचीही कसून चौकशी होत आहे.
वारीस दे पंजाब संघटनेच्या विरोधात देशभरात कारवाई सुरु आहे. नांदेडमध्येही अमृतपाल सिंगचे काही समर्थक राहतात. तीर्थयात्रेच्या निमित्ताने ते भूमिगत झाल्याचं म्हटलं जातंय. हे समर्थक नेमक्या कोणत्या तीर्क्षयात्रेवर गेले आहेत, याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तर शहरातील समर्थकांवरही वॉच ठेवला जातोय.
पंजाब मधल्या पाहिजे असलेल्या अमृतपाल सिंघच्या बाबतीत कोणत्याही तपास यंत्रणेचा नांदेड पोलिसांना अलर्ट आलेला नाही, मात्र आम्ही स्वतः हुन याबाबतीत काळजी घेण्यात येत असल्याचे नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्पष्ट केलंय. नांदेडमध्ये शीख धर्मीय मोठ्या संख्येने राहतात त्यामुळे अमृतपाल सिंघ नांदेडला लपण्यासाठी येण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे नांदेडमध्ये ये-जा करणाऱ्या मंडळींची तपासणी केल्या जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलय.
अमृतपालसिंग नांदेडमध्ये लपण्याची शक्यता असल्याने सध्या नांदेडमध्ये येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी करण्यात येतेय. रेल्वेस्थानकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून येजा करणाऱ्या प्रवाशांची रेल्वे पोलीस तपासणी करतायत. मात्र पोलिसांना अद्याप काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही. नांदेडमध्ये यापूर्वी भिंद्रनवाले यांचे पोस्टर झळकले होते, त्यामुळे अमृतपाल प्रकरणी नांदेड पोलीस अलर्ट झाले आहेत.