अशोक चव्हाणांना काँग्रेसने सगळं दिलं पण…; नांदेडमधून शरद पवारांचा शाब्दिक हल्ला

| Updated on: Nov 09, 2024 | 1:12 PM

Sharad Pawar on Ashok Chavan : शरद पवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसंच काल नरेंद्र मोदी यांनी भाषणात बोलताना 'एक है तो सेफ है' असं विधान केलं होतं. यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

अशोक चव्हाणांना काँग्रेसने सगळं दिलं पण...; नांदेडमधून शरद पवारांचा शाब्दिक हल्ला
अशोक चव्हाण, शरद पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

लोकसभा निवडणुकीवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभा सदस्यत्व देण्यात आलं. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केलीय. लातूरच्या उदगीरमध्ये शरद पवार यांची आज सभा आहे. तिकडे जाण्यासाठी शरद पवार नांदेड विमानतळावर उतरले. यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असं विधान केलं. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

अशोक चव्हाणांवर हल्लाबोल

चव्हाण कुटुंबाला काँग्रेसने मुख्यमंत्रिपद दिलं. देशाचं गृहमंत्रिपद, अर्थमंत्री पद, सरंक्षण मंत्रिपद दिलं. स्वतः अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद दिलं. आणखी काय द्यायचं?, लोक समजतात त्यांना काय धडा शिकवायचा ते शिकवतील, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. शंकरराव चव्हाण यांनी एकदा काँग्रेस सोडून दुसरा पक्ष काढला होता. पण त्यांच्या नावात काँग्रेस हा शब्द होता. विचारधारा काँग्रेसची होती. पण अशोक चव्हाण एकदम विरोधातील विचारधारेसोबत गेले. हा संधीसाधूपणा आहे, असंही शरद पवार म्हणाले.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सध्या पोट निवडणूक होत आहे. यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पोटनिवडणुकीची अजिबात चिंता करण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती चांगली आहे. इथले मतदार भाजपच्या विचारसरणीला अजिबात पाठींबा देणार नाहीत, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

‘एक है तो सेफ है’, ‘बेटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या प्रचारावर शरद पवारांनी टीका केलीय. सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहेच आहे. ती पुन्हा एकदा त्यांनी समोर आणली आहे. निवडणूका येतात आणि जातात पण धर्मा धर्मात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करू नये. पण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना याचं भान नाही. जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ यांना आणलं जातं, असं शरद पवार पवार म्हणाले.