नांदेडः नांदेड शहरात सलग दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. येथील आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. आमदारांविरोधात घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने शिवसैनिक (Nanded ShivSainik) रस्त्यावर उतरले. शहरातील रेस्ट हाऊस परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध मार्चा काढला. बालाजी कल्याणकर हे शिवसेना आमदार सध्या गुवाहटीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात शामिल झाले असून इकडे नांदेडमध्ये शिवसैनिकांनी त्यांचा विरोध करायला सुरुवात केली आहे. शनिवारीही शिवसैनिक कल्याणकर यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. आमदारांची प्रतिकात्मर प्रेतयात्रा शिवसैनिकांनी काढली. तसेच त्यांच्या घरातही घुसण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पोलिसांना या प्रकरणी हस्तक्षेप करावा लागला. आज रविवारीदेखील शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कल्याणकरांविरोधात मोर्चा काढला.
नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकरांविरोधात आज शिवसैनिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. शिवसेनेच्या वतीनं बंडखोरांना आज संध्याकाळपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानुसार बालाजी कल्याणकर यांनी तत्काळ उद्धव ठाकरे यांना शरण येऊन त्यांची माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. बालाजी कल्याणकरांनी बंडखोरी मागे घेतली नाही तर नांदेडमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
आज आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बालाजी कल्याणकरांविरोधात तीव्र निदर्शनं केली. एकनाथ शिंदे आणि कल्याणकर यांच्या फोटोला शिवसैनिकांनी जोडे मारेल .तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. बालाजी कल्याणकरांनी माघार घेतली नाही तर शिवसैनिक अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी दिला.
शनिवारीदेखील नांदेडमधील शिवसैनिकांनी अशाच प्रकारे तीव्र आंदोलन केलं. यावेळी भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. काल बालाजी कल्याणकरांविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात घुसरण्याचा प्रयत्न केला. यावेळी खा. चिखलीकर यांनी शिवसैनिकांना इशारा दिला. बालाजी कल्याणकर यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या केसालाही धक्का लावला तर बघा.. कल्याणकर निवडून येताना त्यांना भाजपने मोठी साथ दिली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी मी घेतो, असं आश्वासनही खा. प्रतापराव पाटलांनी दिलंय.