जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्हा हा सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आहे. दुर्गम भागातील गावांना रस्ते नसतील हे आपण समजू शकतो. मात्र सपाटीच्या भागातील आणि तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तिजोरा गावात जाण्यासाठी रस्ता आणि पूल नसल्याने गावातील नागरिकांना (Rural area) पावसाळ्याच्या चार महिने गावातील विद्यार्थ्यांची शाळा बंद (School closed for students) असते. तर गरोदर मातांना आणि रुग्णांना रुग्णालयात घेऊन जातानाही तारेवरची कसरत करावी लागते अशी व्यथा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागच्या कित्येक वर्षात फक्त आश्वासन दिलं जात आहे. प्रत्यक्ष कृती होताना मात्र काहीचं दिसत नाही. चार महिन्यात इतके हाल सहन करावे लागतात की हिवाळा कधी सुरु होईल याची अनेकजण वाट पाहत असतात.
आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असलो, तरी ग्रामीण भागातील नागरिकांना आजही आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विकासाच्या गप्पा मारत असताना गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्याच्या चार महिने या गावातील मुलं शाळेत जात नाही. तर पावसाळ्यात रुग्णांना जीव धोक्यात घालून रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची वेळ गावकऱ्यांवर येते शहादा तालुक्यातील तिजारे हे गाव प्रातिनिधिक उदाहरण आहे. आजही नंदुरबार जिल्ह्यात अनेक गाव आहेत. गावात शासकीय अधिकारी येतात आश्वासन देतात, मात्र त्यापलीकडे विकासाच्या कोणत्याही गोष्टी होत नाही. आम्ही तालुका मुख्यालयापर्यंत आमच्या समस्या मांडतो. मात्र गेल्या पंधरा वर्षात गावातील एकही समस्या सुटली नसल्याचं राजू निकम गावकरी सांगत आहेत.
राज्यात दुर्गम भागात अद्याप अशी अनेक गाव आहेत, ती गावं विकासापासून वंचित आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील काही अशी गाव आहेत, त्या गावांना फक्त विकास करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्याचबरोबर मागच्या पंधरा वर्षात काहीचं काम केलेलं नाही. पावसाळ्यात चार महिने विद्यार्थ्यांना घरीचं राहावं लागतं कारण शाळेला जाण्यासाठी रस्ता नीटनेटका नाही. त्याचबरोबर पावसाळ्यात एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाताना लोकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.