नाशिक : नाशिकच्या उंटवाडी रोडवर शासकिय संपर्क कार्यालय आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे कार्यालय विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना देण्यात आले होते. दरम्यान याच संपर्क कार्यालयाच्या बाहेर पालकमंत्री दादा भुसे यांनीही संपर्क कार्यालयाचा फलक लावला आहे. एकाच संपर्क कार्यालयाच्या बाहेर दोन वेगवेगळ्या पक्षाच्या दोन नेत्यांनी हे लावलेले फलक पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकच कार्यालय दोघांचे कसे काय ? अशी चर्चा देखील होऊ लागली आहे. नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, तर त्यांचा मतदार संघ हा दिंडोरी आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भेटीसाठी येत असल्याने त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे शासकीय कार्यालय देण्यात आले होते.
दरम्यान, उंटवाडी रोडवर असलेले हे कार्यालय तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतले नव्हते, त्याचे कारण म्हणजे त्यांचे निवासस्थान नाशिक शहरातच आहे.
त्याआधी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होते, त्यांना हे कार्यालय देण्यात आले होते, तेथे त्यांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते कामानिमित्ताने येत असत.
दरम्यान विद्यमान पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावमधील आहे. नाशिकमध्ये त्यांचे निवासस्थान किंवा कार्यालय नाहीत, त्यामुळे त्यांनीही झिरवाळ यांना दिलेल्या कार्यालयावर दावा ठोकला आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या नावाच्या संपर्क कार्यालय असल्याचा फलकही उंटवाडी रोडवरील शासकीय संपर्क कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आला आहे.
एकूणच दोन्ही नेत्यांनी एकाच संपर्क कार्यालयावर दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे हे कार्यालय कुणाचे अशीही चर्चा होऊ लागली आहे.
झिरवळ यांना हे शासकिय संपर्क कार्यालय देण्यात आलेले असतांना दादा भुसे कसा काय दावा करू शकतात अशीही चर्चा आता महाविकास आघाडीच्या नेत्यानकडून होऊ लागली आहे.
आता दोन्ही नेत्यांनी शासकिय कार्यालयावर दावा केल्याने महाविकास आघाडी आणि शिंदे गटात नवा सामना सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.