मुंबई : “सिंधुदुर्गात 70 पैकी 47 ग्रामपंचायती आम्ही जिंकलो आहे. तर शिवसेनेच्या 70 पैकी 21 जागा आल्या. राज्यात निकालात शिवसेना थोडी पुढे असेल. पण आमचे 105 आमदार आहेत. शिवसेनेचे 56 आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद कमी होते आहे,” असा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. (Narayan Rane Comment on Sindhudurg Gram Panchayat Election Results 2021)
“पालकमंत्री, आमदार, खासदार असतानाही फक्त 21 जागा मिळाव्यात. यावरून त्यांची ताकद कमी झालेली दिसते आहे. पुढच्या निवडणुकीत ताकद यापेक्षा कमी झाली असेल. शिवसेनेला सिंधुदुर्गात जनता साथ देणार नाही. शिवसेनेने विकास कामे केली नाहीत. वादळात द्यायची मदतही पाठवली नाही. जिल्ह्याच्या नियोजनासाठी निधी दिला नाही. कोरोनासाठी फक्त 21 कोटी दिले, कुठे आहे विकास ?” असा सवाल नारायण राणेंनी केला.
“सिंधुदुर्गातील जनतेचा मी ऋणी”
“सिंधुदुर्गात 70 पैकी 47 ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाला आहे. सिंधुदुर्गच्या जनतेने नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला आहे. जिल्ह्याचा विकास करण्याची क्षमता माझ्यात आहे याची जनतेला खात्री आहे. त्यामुळे जनतेने जे निवडून दिले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे,” असेही नारायण राणे म्हणाले.
“आता जे निकाल आहेत त्या तिघांची मिळून आकडेवारी मोठी होते. पण जनतेची साथ यांना मिळणार नाही. कोरोनात तर हे उघडे पडले. सर्वाधिक कोरोना मृत्यू हे महाराष्ट्रात झाले. तरीही नंबर 1 मुख्यमंत्री? मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात काही दिसत नाही. कर्तृत्व दिसत नाही तर जनता विश्वास काय ठेवणार?” असा टोलाही नारायण राणेंनी लगावला. (Narayan Rane Comment on Sindhudurg Gram Panchayat Election Results 2021)
“एवढे कर्तृत्व आहे त्यांचे तर त्यांनी संभाजीनगर नामकरण करून दाखवावे ! तिघे एकत्र असले तरी, धैयधोरण एक आहे का? नामांतर करण्यासाठी या मुख्यमंत्र्यांमध्ये दम नाही,” असेही नारायण राणेंनी सांगितले.
“मला वाटतं नाही, सिंधुदुर्गात विमान वाहतूक सुरू होईल. माझ्या कारकिर्दीत 2014 ला हा एअरपोर्ट पूर्ण झाला. फक्त पाणी रस्ता राहिला होता. अद्याप ते पूर्ण न झाल्याने विमान वाहतूक होऊ शकत नाही. या 3 गोष्टी नसल्याने वाहतूक सुरू होऊ शकत नाही. हायवे पासून एअरपोर्ट पर्यंत रस्ता पाहिजे त्याला 32 कोटी रुपये हवेत. 6 वर्षात ते देऊ शकले नाहीत. पाणी नाही दिले. वीजेची केबल देऊ शकले नाही. त्यासाठी 50 कोटी शिवसेना सत्तेत असून 5 वर्षे खर्च करू शकलो नाही. पालकमंत्री विमान वाहतूक सुरु होण्याच्या वेगवेगळ्या तारखा सांगत आहेत.”
“विनायक राऊत यांनी तर विमानतळ होऊ नये म्हणून जमीन अधिग्रहणावेळी आंदोलन केले आणि आता उद्घाटने करतात. हे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. त्यामुळे 8 ते 10 दिवसांत विमान सेवा सुरू होणे अशक्य आहे,” असे नारायण राणेंनी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून आंदोलन करणार? बरं आहे ते मातोश्रीतून बाहेर पडतील. त्यांनी आधी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यावेत. आम्ही सुधारणा केलेलं बिल त्यांनी समजून घ्यावे आणि मग रस्त्यावर यावे, असा टोलाही राणेंनी लगावला.
शरद पवार यांचा या विधेयकाला विरोध नसावा किंवा ते त्या मताचे नसावेत. आम्ही आणलेल्या बिलाला त्यांचा पाठिंबा असला पाहिजे कारण त्या मताचे ते होते. आता राजकारण काही असतं. त्यामुळे त्यांना रस्त्यावर येऊ द्या. नाहीतरी लोकांना मुख्यमंत्री दिसत नाही. त्या निमित्ताने ते लोकांना दिसतील, अशी खोचक टीका नारायण राणेंनी केली. (Narayan Rane Comment on Sindhudurg Gram Panchayat Election Results 2021)
संबंधित बातम्या :