Nashik | कोविड रुग्णालयांकडे तब्बल 8 कोटी 26 लाखांची वीजबिल थकबाकी; काय होणार कारवाई?

| Updated on: Jan 30, 2022 | 7:04 AM

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीजजोडण्यांची 1 कोटी 66 लाख 42 हजार 640 रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 10 लाख 75 हजार 848 रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

Nashik | कोविड रुग्णालयांकडे तब्बल 8 कोटी 26 लाखांची वीजबिल थकबाकी; काय होणार कारवाई?
electricity bill
Follow us on

नाशिकः खान्देशातील जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यांतील विविध कोविड रुग्णालयांकडे 8 कोटी 26 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही. कोविडच्या संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र, रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही. आता ती वसुली कशी करायची असा प्रश्न महावितरणपुढे उभा ठाकला आहे.

अशी आहे थकबाकी…

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीजजोडण्यांची 1 कोटी 66 लाख 42 हजार 640 रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 10 लाख 75 हजार 848 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे तब्बल 4 कोटी 66 लाख 36 हजार 223 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे 83 लाख 80 हजार 887 रुपये तर शिरपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे 12 लाख 67 हजार 76 रुपये वीजबिल थकले आहे. नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 61 लाख 43 हजार 324 रुपये वीजबिल थकीत आहे.

मुख्य अभियंत्यांचे आवाहन

महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी नुकतेच या रुग्णालयांच्या अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून वीजबिलाची पूर्ण थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. पत्रात म्हटले आहे की, थकबाकी भरण्यासंदर्भात आपल्याला वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही आपणाकडून कोणताही योग्य प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. कोविड-19 आपत्तीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून, थकबाकी वसूल करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा कंपनी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. या पत्रांच्या प्रती जळगाव, धुळे व नंदुरबारचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून, थकबाकी वसूल करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा कंपनी नियमाप्रमाणे कार्यवाही करू.
– कैलास हुमणे, मुख्य अभियंता

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?