विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असं असताना राज्यातील राजकीय समिकरणांकडे सर्वांचंच लक्ष आहे. अजित पवारांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष आहे. अशातच अजित पवारांनी ‘जन सन्मान यात्रा’ काढली आहे. या यात्रेअंतर्गत ते विविध ठिकाणांना भेटी देत आहेत. ही यात्रा म्हणजे अजित पवारांची स्वबळाची तयारी असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये अजित पवारांशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. तेव्हा आगामी विधानसभा निवडणूक, आघाडी- युती, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट मतं मांडली. राष्ट्रवादी विधानसभेला स्वबळावर लढणार का? यावरही अजित पवार बोलते झालेत.
आजतरी राज्यात अशी स्थिती नाही की कोणत्याही एका पक्षाचं सरकार येईल… आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा दोन- दोन पक्षांची आघाडी होती. 40 वर्षे महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, जयललिता, स्टॅलिन, करूणानिधी, अरविंद केजरीवाल या नेत्यांनी स्वबळावर सरकार आणलं तसं महाराष्ट्रात झालेलं नाही. मागच्या कित्येक वर्षात हा एक व्यक्ती आमचा नेता, त्याच्या पाठिशी आम्ही आहोत, असं म्हणत सरकार आलं असं झालेलं नाही. आताच्याही निवडणुकीत सगळ्यांनाच तीन- तीन मित्र पक्षांना घेऊन निवडणूक लढवावी लागतं, ही महाराष्ट्राची ओळख आहे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार सध्या गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करतात. ‘जन सन्मान यात्रे’ ची थीमदेखील गुलाबी आहे. या मागचं कारण काय? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. तेव्हा अर्थसंकल्प सादर केला. यात लोकांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले. लाडकी बहीण योजना आणि वीजमाफीची योजना या योजना लोकांमध्ये लोकप्रिय झाल्या. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी ही ‘जन सन्मान यात्रा’ आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
युगेंद्र पवार यांनी बारामतीतून शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. ज्यांना लढायचं ते लढू शकतात, असं अजित पवार म्हणाले.