नाशिक : जगाला शांती आणि अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या ( Nashik Budhha Paurnima ) जयंती निमित्त नाशिकमध्ये डोळ्यांचे पारणे फिटेल असा अद्भूत सोहळा साजरा झाला. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्यावतीने नाशिक ( Nashik ) जिल्ह्यातील तब्बल शंभर गावांना भगवान गौतम बुद्धांच्या पाच फूटांच्या मूर्तींचे दान करण्यात आले. शंभर रथांमधून या या शंभर बुद्ध मूर्तींची मिरवणूक निघाली आणि संपूर्ण वातावरणच पवित्र आणि मंगलमय झाले. हा सोहळा आणि मिरवणूक संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वैशाख पोर्णिमा म्हणजेच बुद्ध पोर्णिमेला तथागत गौतम बुद्ध यांची जयंती जगभरात आनंद आणि उत्साहात साजरी केली जात असते. नाशिक महानगरीत यंदा आणखीनच उत्साहाला उधाण आले होते. नाशिक शहरातून हजारो नागरिकांनी बुद्ध मूर्तींची मिरवणूक काढली. यावेळी जिल्हाच्या विविध तालुक्यातील शंभर गावातील 500 श्रामणेर आणि हजारो बौद्ध बांधवांसह नागरिक सहभागी झाले होते. सम्राट अशोक जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बुद्ध पोर्णिमेनिमित्त 23 एप्रिल ते 2 मे दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये श्रामणेर शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शंभर गावातील प्रत्येक पाच उपासकांना श्रामणेर शिबिरात दीक्षा देण्यात आली.
नाशिक शंभर जिल्हयांना शंभर गौतम बुद्धांच्या पाच फूटांच्या मूर्तींचे अनोखे दान करण्यासाठी शंभर रथांमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मूर्ती फायबरपासून एकाच साच्यात तयार करण्यात आल्या होत्या. फुलांची आरास आणि निळे झेंडे लावून शंभर रथातून निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. तसेच अनेक किलोमीटर ही मिरवणूक चालली. शहरातील जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल क्लब येथे शोभायात्रा निघाली. यानंतर महाबौद्ध धम्म परिषदेत भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल, भदन्त धम्मरत्न, भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्यात सीमा पाटील आणि जॉली मोरे यांच्या बौद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.