नाशिक : नाशिकच्या शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना बिबट्याचा (Leopard) वावर काही नवीन नाही. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे वारंवार होणारे दर्शन, हल्ले आणि हुलकवणीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे नाशिकची (Nashik) धार्मिक नगरी, वाईन कॅपिटल, द्राक्ष आणि कांद्याची पंढरी म्हणून ओळख असली तरी आता बिबट्यांचे शहर म्हणून नवी ओळख होत आहे. नुकतेच सिन्नर (Sinnar) येथे दोन बिबट्यांचा थेट नारळाच्या झाडावरील व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह शेतमजुरांना या व्हिडिओने चांगलीच धडकी भरवली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबट्यांचा धुमाकूळ बघायला मिळत आहे. दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकूणच नाशिक जिल्हा आता बिबट्या हब बनला आहे का ? काय असा प्रश्न आता नाशिककरांना पडू लागला आहे.
सिन्नर तालुक्यातील पाथरी या गावी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे.
त्याला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, सिन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची दहशत कायम असल्याचे सध्या दृश्य आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, निफाड या तालुक्यातील गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
मागील काही दिवसापासून बिबट्याने सातत्याने शेतकऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना या घडतच आहेत. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त लावावा अशी मागणी आता जोर धरत आहे.
नाशिकमध्ये गोदावरी नदी, जंगल परिसर असल्याने बिबट्याचा मुक्तसंचार दिसून येतो. बिबट्याचे हिंसक रूप नागरिकांना अनुभवायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणविभागणे पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक करीत आहे.