नाशिकः राज्यातील कोरोना लसीकरणाच्या रँकिंगमध्ये 19 व्या क्रमाकांवर असलेल्या नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, जिल्ह्यात पहिल्या डोस ८० टक्के, तर दुसरा डोस ४० टक्के जणांनीच घेतल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
लसीकरणाकडे पाठ का?
नाशिक जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 70 लाख 43 हजार आहे. जिल्ह्यात १८ वर्षांवरील लसीकरणासाठी पात्र लोकांची संख्या तब्बल 51 लाख 75 हजार इतकी आहे. मात्र, या लोकांपैकी पहिला डोस 40 लाख 41 हजार जणांनी घेतलाय, तर दुसरा डोस केवळ 20 लाख 38 हजार लोकांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा राज्यात 19 व्या स्थानी आहे. जिल्ह्यातील कमी लसीकरणाची कारणे शोधले असता त्यात कोरोनाचे गांभीर्य कमी होणे, अंधश्रद्धा आणि लस घेतल्यानंतर आजारी पडल्यास होणार खर्च, तितके दिवस रोजगार बुडण्याची ही असल्याचे समोर आले आहे.
येथे लसीकरण कमी
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका क्षेत्रातील मुस्लीम बहुल भागात लसीकरणाचे प्रमाण कमी असून, या भागात लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासनाने मौलवींची देखील मदत घेतली आहे. तर आदिवासी बहुल भागात सामाजिक संस्था प्रशासनाला मदत करत आहेत. जिल्ह्याच्या मालेगावसह येवला, बागलाण, सुरगाणा आणि नांदगाव या चार तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने या भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, जिल्ह्याच्या काही तालुक्यात ही परिस्थिती असली, तरी नाशिक तालुक्यात 100 % लसीकरण झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
लस नसेल तर प्रवेश नाही
नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले जाईल. हे नवे नियम 23 तारखेपासून अंमलात येतील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरजकुमार मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लसीकरण वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.
पार्ट्यांचे काय?
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 31 डिसेंबरच्या पार्ट्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांची तपासणी करावी. त्यांचे लसीकरण झाले आहे का, हे पाहावे. फाईव्ह स्टार हॉटेल्स असतील किंवा कोणतेही हॉटेल असतील. परवानगी देताना अटींची पूर्तता होत नसेल, तर पोलिसांची कारवाई होईल. ज्यांना कार्यक्रम करायचे आहेत, त्यांनी काळजी घेतली पाहिजे. येणाऱ्या 10 दिवसांत काय घ्यायचा तो आनंद घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या हालचाली, राऊतांचं थेट आव्हान